नाशिक जिल्ह्यात पुन्हा पर्यटकांवर हल्ला : मारहाण करीत केली वाहनाची तोडफोड
घोटी/नाशिक (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावरील बोरीची वाडी आणि वावी हर्ष परिसरात पर्यटकांवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे शिवाय वाहनाचीदेखील आरोपींनी तोडफोड केली. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रसिद्ध हरिहर किल्ला पाहून परतणार्या पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना अडवून मारहाण आणि वाहनावर दगडफेक करण्यात आल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नव्याने उभा ठाकला आहे.




काय आहे प्रकरण ?
पर्यटक हरिहर किल्ल्याला भेट देऊन आपल्या वाहनाने परतत होते. बोरीची वाडी परिसरात त्यांची गाडी जात असताना एका मोटारसायकलला त्यांच्या गाडीचा षकट’ लागला. याच क्षुल्लक कारणावरून मोटारसायकलस्वार आणि पर्यटकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढल्याने संबंधितांनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला.
गाडी अडवून लाठ्या-काठ्यांनी मारहाण आणि दगडफेक
काही अंतर पाठलाग केल्यानंतर वावी हर्ष परिसरात या टोळक्याने पर्यटकांची गाडी अडवली. त्यानंतर चालक आणि प्रवाशांना गाडीतून खाली ओढून त्यांना शिवीगाळ करत काठी आणि चापटीने अमानुष मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पर्यटकांच्या वाहनावर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीची समोरील काच आणि साईड मिरर फुटले तसेच लाठ्या-काठ्या आणि दगडांनी गाडीचे छत आणि बंपरही फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. हल्लेखोरांनी पर्यटकांना जिवे मारण्याची धमकीही दिली.
चार आरोपींना तासाभरात अटक
या घटनेमुळे भयभीत झालेल्या पर्यटकांनी घोटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आणि तातडीने तपासाची चक्रे फिरवली. कारवाईचा वेग वाढवत पोलिसांनी अवघ्या तासाभरात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित सहा आरोपींचा सध्या कसून शोध घेतला जात आहे.
पर्यटन मार्गांवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, हरिहर किल्ला आणि इगतपुरी-घोटी परिसरात राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते मात्र मोटारसायकलला कट लागल्यासारख्या किरकोळ कारणावरून थेट पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करून हल्ला करण्याच्या प्रवृत्तीमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटन मार्गांवर पोलिसांची गस्त वाढवावी आणि पर्यटकांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी होत आहे.