व्यवस्थेचे बळी : आदिवासी आश्रमशाळेत जमिनीवर झोपलेल्या तीन चिमुकलींचा सर्पदंशाने मृत्यू

तीन जणींवर उपचार सुरू : जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश


गडचिरोली (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : गडचिरोली जिल्ह्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री 6 विद्यार्थिनींना विषारी साप चावल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला असून तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर शासन खळबडून जागे झाले असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जमिनीवर झोपलेल्या मुलींना सर्पदंश
कुपारलिंगी शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील सहावीतील दीपिका इतवा लकड़ा (12), आठवीतील सुष्मिता सरोजित मंडल (14) व दुसरीतील अनुगजुगम कोरेटी (8) या विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला तर पाचवीतील दैपिका मडावीला (11) हेलिकॉप्टरने नागपूरला हलवण्यात आले असून तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत या शिवाय आठवीची विद्यार्थिनी समृद्धी सुरेश नेताम (14) जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेटींलेटरवर उपचार सुरू आहेत. या घटनेने भयभीत कविता राजकुमार किरंगावरही उपचार सुरू आहेत.





9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 ते 2 दरम्यान पट्टेरी मण्यार या अतिविषारी सापाने दंश केल्याने ही घटना धानोरा तालुक्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री घडली.

हे तर व्यवस्थेचे बळी !
शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्व प्रकारच्या भौतीक सुविधांची जबाबदारी ही प्रकल्प अधिकार्‍यांची आहे, तर खासगी अनुदानित आश्रमशाळेत भौतिक सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही शाळेचे संचालन करणार्‍या संस्थेची, शाळा व्यवस्थापनाची आहे. मागील कित्येक वर्षांपासून 100 टक्के अनुदान घेणार्‍या शाळेतील विद्यार्थी हे 2026 पर्यंत जमिनीवर गाद्या टाकून झोपतात आणि आश्रमशाळांचे सातत्याने इन्स्पेक्शन करणार्‍या आदिवासी प्रकल्प विभागाला त्याची माहिती नसणे हे या तीनही विद्यार्थिनींच्या मृत्यूचे मूळ कारण आहे.

यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या झोपण्याच्या सोयींचा कॉलमच नाही
आश्रमशाळा निरीक्षण यादीमधील भौतिक सुविधा तपासणार्‍या तपासणी यादीत विद्यार्थ्यांच्या झोपण्यासाठी केलेल्या सोयींचा कॉलमच नाही. त्यामुळे प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी आश्रमशाळेची जी तपासणी केली त्यात शाळेतील विद्यार्थी जमिनीवर झोपतात. याची माहितीच प्रकल्प अधिकारी कार्यालयाला मिळाली नाही असे प्रकल्प अधिकार्‍याचे म्हणणे आहे.

संस्थाचालक जबाबदार
राज्यातील सर्व आश्रमशाळांचे सर्वांगीण अंकेक्षण करण्याची गरज सर्पदंशाने मृत्युप्रकरणी शाळा व्यवस्थापन, संस्थाचालक जबाबदार आहेत हे कुणीही नाकारणार नाही परंतु तपासणीसाठी चेक लिस्ट तयार करणारा प्रकल्प विभाग, त्याचे मॉनिटरिंग करणारे आदिवासी विकास मंत्रालय हेही तेवढेच दोषी आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !