सर्पदंशाने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा मृत्यू : आश्रमशाळेची मान्यताच रद्द ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
गडचिरोली (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : रात्री गाढ झोपेतील विद्यार्थिनींना विषारी सर्पाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. राज्यभरात खळबळ उडवणारी ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाईत येथील आश्रमशाळेत घडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेत या आश्रमशाळेची मान्यताच रद्द केली आहे.
काँग्रेस पदाधिकार्याची आश्रमशाळा
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आश्रमशाळा ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले मारोतराव कोवासे यांची आहे. एवढे अनुभवी नेते जर अशा बेजबाबदार पद्धतीने आश्रमशाळा चालवून लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर त्यांना माफी कशी द्यावी, असा संतप्त सवाल उपस्थित करत आदिवासी समाजातील मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या घटनेवर अत्यंत कठोर आणि संतप्त भूमिका मांडली आहे.



काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना म्हटले की, संबंधित शाळेत शिक्षक नसेल, वॉर्ड नसेल, शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा दिली जात नसेल तर या आश्रमशाळेची ज्या अधिकार्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा, असे आदेश दिले आहेत तसेच रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित तपासणी करा. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, असेही निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. याचसोबत मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करावी. सर्व विभांगांना त्यात समाविष्ट करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले, तीन मुली दगावल्या आहेत. तीन मुलींवर उपचार सुरु आहेत. अनुदानित शाळेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. आदिवासी विकास विभागाचा निरीक्षक प्रत्येक महिन्याला शाळा तपासेल. महाराष्ट्रात अनुदानित आश्रम शाळा कार्यरत आहेत, त्या सर्व शाळांची त्रयस्थ संस्थेंकडून चौकशी करुन तपासणी केली जाईल. आज यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अनुदानित आश्रम शाळेत प्रकार घडला त्यात मुख्याध्यापक, शिक्षक नव्हते फक्त दोन कर्मचारी होते. संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. काल चर्चा केली असता, अनुदानित आश्रमांचे मूल्यमापन करत व्यवस्था नसलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येईल. 1992 पासून गडचिरोली जिल्ह्यातील जलतराईत ही आश्रम शाळा आहे. या शाळेचे संचालक खासदार राहिले आहेत, आमदार राहिले आहेत. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले.