वरणगाव भूमिगत गटार प्रकल्पासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नगरोत्थानमध्ये निधी उपलब्ध नसेल तर ‘मुरेफ’ योजनेतून प्रकल्प मंजूर करण्याची मागणी ; 83 कोटींचा प्रस्ताव सादर


वरणगाव (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : वरणगाव शहरातील सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी भूमिगत गटार प्रकल्प मंजूर व्हावा, यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन वरणगावच्या भूमिगत गटार प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्याची मागणी केली.

83 कोटींचा प्रकल्पाचा प्रस्ताव सादर
वरणगाव शहरासाठी सुमारे 83 कोटी रुपयांचा भूमिगत गटार प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नगरोत्थान योजनेतून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत नसल्यास जागतिक बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या ‘मुरेफ’ योजनेतून प्रकल्प मंजूर करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.





तर येणार नाही रस्ते खोदण्याची वेळ
शहरात सध्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत त्यामुळे अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. भविष्यात नवीन रस्त्यांची कामे करण्यापूर्वी भूमिगत गटार प्रकल्प मंजूर झाल्यास रस्ते पुन्हा खोदण्याची वेळ येणार नाही आणि नागरिकांची सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल, असे नगराध्यक्ष काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुख्यमंत्र्यांकडून तातडीच्या सूचना
नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या लेखी सूचना दिल्याचे सांगण्यात आले. तसेच उपस्थित नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलावून वरणगावचा भूमिगत गटार प्रकल्प ‘मुरेफ’ योजनेतून मंजूर करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

वरणगाव शहराच्या विकासासाठी भूमिगत गटार प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, तो मंजूर होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासोबत नगरसेवक नाना चौधरी, मिलिंद भैसे, अजमल खान, आकाश निमकर, मयूर गावंडे आणि फझल भाई उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !