धावपळीच्या जीवनशैलीत शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष : भुसावळात बालरोगतज्ज्ञ डॉ.रेखा पाटील

श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ‘आधुनिक जीवनशैली आणि निरोगी आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन


भुसावळ (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : आधुनिक धावपळीच्या जीवनशैलीत सोशल मीडियाला अधिक महत्त्व देताना अनेकदा शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. रेखा पाटील यांनी येथे व्यक्त केले. निरोगी जीवन जगण्यासाठी निरोगी शरीरासोबतच निरोगी मन असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भुसावळ शहरातील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयातील हेल्थ केअर सेंटर आणि कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 22 ऑगस्ट 2026 रोजी ‘आधुनिक जीवनशैली आणि निरोगी आरोग्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.मीना चौधरी होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.रेखा पाटील उपस्थित होत्या.

सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांना मोठे महत्त्व
डॉ.रेखा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात आधुनिक जीवनशैलीतील बदलांवर भाष्य केले. आजच्या काळात सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांना मोठे महत्त्व दिले जात असून, या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले. खरंच आपले मन निरोगी आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपणेही महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, ध्यान-धारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक विचारसरणी यांचा समतोल साधल्यास आनंदी व निरोगी जीवन जगता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्याबाबत सजग रहा : प्राचार्य
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्या डॉ.मीना चौधरी यांनी विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहून योग्य सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन केले. मानसिक किंवा भावनिक अडचणी जाणवल्यास संकोच न बाळगता आवश्यकतेनुसार कौन्सिलिंगची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा.वसंत खरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दीपाली पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भावना संकोपाळ यांनी तर आभार प्रा.रोहिणी सोनवणे यांनी मानले.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवन या संकल्पनेला बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !