भुसावळात सामाजिक बांधिलकी जपत ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीनंतर स्वच्छता मोहीम
युवक गौस नगर, इमाम व अराकीन गौसिया मस्जिदतर्फे दरवर्षी स्वच्छता यंदा दीड टन कचरा संकलीत
भुसावळ (शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026) : धार्मिक उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत शहर स्वच्छ ठेवण्याचा आदर्श भुसावळातील युवकांनी घालून दिला. ईद-ए-मिलादनिमित्त बुधवार, 26 रोजी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल सहा तास चाललेल्या या मिरवणुकीत सुमारे 25 हजार नागरिक सहभागी झाले. मिरवणूक संपल्यानंतर रस्त्यावर पडलेला कचरा तसाच न सोडता युवक गौस नगर, इमाम व अराकीन गौसिया मस्जिद, भुसावळ यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल दीड टन कचरा संकलित करून मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्यात आला.
ईद-ए-मिलादच्या उत्साहात शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक मार्गक्रमण करीत होती. शहरातील रजा टॉवर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. तेथून अमरदीप टॉकीज चौक, नसरवजी फाईल, आगाखान वाडा, शिवाजीनगर रिक्षा थांबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडेल रोड, गांधी पोलिस चौकी, सराफ बाजार, जामा मशीद, पहिलवान गल्ली, मच्छी वाडा, अमरदीप चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पुन्हा रजा टॉवर येथे मिरवणुकीचा समारोप झाला.



मिरवणूक संपताच हातात घेतले झाडू
मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने रस्त्यावर प्लॅस्टिकचे ग्लास, कागदी प्लेट, कागद तसेच अन्य कचरा पडला होता. मिरवणूक संपल्यानंतर रस्त्यावर अस्वच्छता दिसत असतानाच युवक गौस नगर, इमाम व अराकीन गौसिया मस्जिद, भुसावळ यांच्या वतीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.
अस्वच्छ झालेले रस्ते काही वेळातच स्वच्छ
स्वतः हातात झाडू घेऊन युवकांनी मिरवणूक ज्या मार्गाने गेली त्या मार्गाची स्वच्छता केली. रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करून गोण्यांमध्ये भरण्यात आला. त्यानंतर हा कचरा वाहून नेण्यात आला. त्यामुळे काही वेळापूर्वी नागरिकांच्या गर्दीने गजबजलेले आणि कचर्यामुळे अस्वच्छ झालेले रस्ते काही वेळातच स्वच्छ झाले.
दरवर्षी राबवतात स्वच्छता मोहीम
विशेष म्हणजे युवक गौस नगर, इमाम व अराकीन गौसिया मस्जिद, भुसावळ यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीनंतर दरवर्षी रस्त्यावरील स्वच्छता केली जाते. धार्मिक कार्यक्रमानंतर सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली अस्वच्छता दूर करणे ही आपलीही जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
यंदाही मिरवणूक संपताच युवकांनी विलंब न करता स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. दीड टन कचरा संकलित करून मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्यात आला.
उत्सवाबरोबर स्वच्छतेचा संदेश
धार्मिक उत्सव श्रद्धेने साजरा करण्यासोबतच शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. मिरवणुकीनंतर स्वच्छता करण्याच्या या उपक्रमातून ‘उत्सव आपला, शहरही आपले आणि त्याची स्वच्छताही आपलीच जबाबदारी’, असा सकारात्मक संदेश देण्यात आला.
मोठ्या धार्मिक मिरवणुकीनंतर संबंधित युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्ते स्वच्छ करण्याची परंपरा कायम ठेवल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम भुसावळ शहरासाठी निश्चितच अनुकरणीय ठरला.
