राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जळगाव शहरात शंभर बळी घ्यायचे आहेत का? भाजपा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा संताप

जळगावकरांच्या जीवाशी आणखी किती खेळणार? नियोजनशून्य कारभार तातडीने थांबण्याची अपेक्षा ः मानराज पार्कसमोरील महामार्गाची एक बाजू दीर्घकाळ बंद ठेवून काम सुरू करण्याची एवढी घाई कशासाठी?


 

जळगाव (सोमवार, 31 ऑगस्ट 2026) : जळगाव शहरात सातत्याने अपघाताची मालिका सुरू असल्याने त्यात निष्पाप नागरिकांचे प्राण जात असल्याने समाजमन संतप्त झाले आहे. जळगावातील भाजपाचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नहीं) ला जाब विचारत जळगावात आणखी शंभर बळी घ्यायचे आहेत का ? असा संतप्त सवाल केला आहे.


समांतर रस्त्यापूर्वीच केली बंद एक बाजू
देशमुख यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील वाहतुकीची परिस्थिती आधीच गंभीर आहे. बायपास अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. सध्या तो अंशतः सुरू असून संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी सुमारे दोन महिने लागतील, असे चित्र आहे. दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेतर्फे खोटे नगर ते मानराज पार्क परिसरात नागरिकांना पर्यायी व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी समांतर रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. मनपाचा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र महानगरपालिकेचा समांतर रस्ता पूर्ण होण्याची वाट न पाहता नहींने मानराज पार्कसमोरील महामार्गाची एक बाजू बंद करून उड्डाणपुलावरील मोठे काम हाती घेण्याची एवढी घाई का केली? हे काम दीर्घकाळ चालणार असेल आणि किमान महिनाभर या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार असेल, तर त्या काळात हजारो जळगावकरांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

हा तर वाहतूक कोंडी निर्माण करण्याचा प्रकार !
एका बाजूला बायपास पूर्ण क्षमतेने सुरू नाही, दुसर्‍या बाजूला महानगरपालिका पर्यायी समांतर रस्ता तयार करत आहे आणि तो अद्याप पूर्ण झालेला नाही. अशा वेळी मुख्य महामार्गाचीच एक बाजू बंद करणे म्हणजे वाहतुकीची कोंडी स्वतःहून निर्माण करण्यासारखे नाही का? नहींला एवढेही नियोजन करता आले नाही का की, आधी बायपास पूर्ण क्षमतेने सुरू होऊ द्यावा, महानगरपालिकेचा समांतर रस्ता पूर्ण होऊ द्यावा आणि त्यानंतर मनपा, वाहतूक पोलीस व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करून उड्डाणपुलाचे काम सुरू करावे? आधीच शहरातील महामार्गाच्या वाहतूक समस्येने निष्पाप नागरिकांचे बळी घेतले आहेत. नहींला वारंवार निवेदने देऊन सावध केले. पाच बळी पुरे झाले, आता आणखी एकही बळी नको, अशी मागणी करण्यात आली मात्र जळगावकरांच्या सुरक्षिततेचा विचार न करता असे निर्णय घेतले जाणार असतील तर नहींला जळगाव शहरातील बळींचा आकडा 100 पर्यंत न्यायचा आहे का? असा प्रश्न विचारण्यास वाव आहे.

नियोजन करणे ही जवाबदारी नाही का ?
एखादी दुर्घटना घडल्यानंतर बैठक घेणे, पाहणी करणे आणि उपाययोजना जाहीर करणे यापेक्षा दुर्घटना होऊच नये यासाठी आधी नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? विकासकामाला विरोध नाही. उड्डाणपुलाचे काम झालेच पाहिजे पण कामाच्या नावाखाली जळगावकरांना महिनाभर वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्यात ढकलणे आम्हाला मान्य नाही. विकासकामी नागरिकांच्या सोयीसाठी असतात त्यांच्या जीवावर उठण्यासाठी नाही!

कार्यालयातून आदेशाऐवजी प्रत्यक्ष करावी पाहणी
नहींच्या अधिकार्‍यांनी वातानुकूलित कार्यालयातून आदेश देण्याऐवजी सकाळी आणि संध्याकाळी मानराज पार्क-शिव कॉलनी-खोटे नगर मार्गावर प्रत्यक्ष उभे राहून परिस्थिती पाहावी. महामार्गाची एक बाजू बंद असताना दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने आणि स्थानिक वाहतूक कशी जीवघेणी कोंडी निर्माण करते, हे स्वतः अनुभवावे. मानराज पार्कसमोरील महामार्गाची एक बाजू बंद ठेवण्याच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करा. आधी सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करा. महानगरपालिकेच्या समांतर रस्त्याच्या कामाशी समन्वय साधा. बायपासची परिस्थिती लक्षात घ्या आणि त्यानंतरच पुढील कामाचे नियोजन करा, असे खडे बोल जळगावातील प्रभाग क्रमांक 15 चे भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख यांनी सुनावले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !