दोन हजारांचे लाच प्रकरण : लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा
नाशिक (मंगळवार, 1 सप्टेंबर 2026) :शासकीय कामासाठी लाचेची मागणी करून दोन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक येथील वरिष्ठ सहायक रामचंद्र नरसू माकरे यांना न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार देण्यात आला.
वैद्यकीय बिलासाठी मागितली होती लाच
तक्रारदार यांचे शासनाकडून मंजूर झालेले वैद्यकीय बिल बँक खात्यात जमा करण्यासाठी आरोपी रामचंद्र माकरे यांनी तीन हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर दोन हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले होते. या कारवाईनंतर सातपूर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले.

न्यायालयात सुनावणी
या प्रकरणाची सुनावणी नाशिकच्या जल्हा व सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार दोषी ठरवत एक वर्षाच्या कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
यांनी पाहिले कामकाज
एसीबी अधीक्षक भरत तांगडे, अपर अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे यांनी कामकाज पाहिले. सरकारतर्फे अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन गोरवाडकर यांनी कामकाज पाहिले.
नागरिकांसाठी हेल्पलाईन
कुठल्याही शासकीय कार्यालयात अधिकारी वा कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्यास नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा संपर्क क्रमांक तसेच टोल-फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

