रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी : जळगावात कंत्राटदार कंपनीसह मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जळगावातील भाजपा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी उचलला होता आवाज : अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अपघात न होण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे केले होते आवाहन


जळगाव (मंगळवार, 1 ऑगस्ट 2026) : शहरातून जाणार्‍या महामार्गावरील वाढते अपघात, गंभीर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरणार्‍या त्रृटींची चौकशी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नहीं) आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, निष्काळजीपणा किंवा कायदेशीर कर्तव्यात कसूर आढळल्यास प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी बैठकीत लावून धरली. पोलीस प्रशासनाने या अनुषंगाने कंत्राटदार कंपनीसह मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी सरकारतर्फे दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

23 दिवसात चौघांचा मृत्यू तर वर्षभरात महामार्गावर 70 जणांचा मृत्यू
भाजपा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी बैठकीत वर्षभरात जळगाव शहर व परिसरातील महामार्गावर सुमारे 70 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तसेच बायपास बंद झाल्यानंतर अवघ्या 23 दिवसांत चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगत ही परिस्थिती केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून अनेक कुटुंबांवर त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित यंत्रणांची निष्क्रियता, कर्तव्यातील संभाव्य कसूर आणि सुरक्षात्मक उपाययोजनांकडे झालेले दुर्लक्ष यांची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. चौकशीत निष्काळजीपणा किंवा कायदेशीर कर्तव्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित नहींच्या अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. ‘जळगावकरांचा जीव स्वस्त नाही, अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अपघात होऊ नये याची जबाबदारी स्वीकारावी, असे देशमुख यांनी बैठकीत सांगितले.


बायपास बंद झाल्याने शहरातील वाहतुकीवर ताण
पाळधी-तरसोद बायपास बंद झाल्यानंतर अवजड वाहनांचा मोठा भार शहरातून जाणार्‍या महामार्गावर वाढला आहे. अशा परिस्थितीत महामार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी नहीं आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक होते मात्र अनेक ठिकाणी खड्डे, खचलेल्या व असमतोल साईडपट्ट्या, धोकादायक उंचवटे, अपुरी प्रकाशव्यवस्था, चेतावणी फलकांचा अभाव तसेच रिफ्लेक्टर आणि रम्बल स्ट्रिप्सची अपुरी व्यवस्था असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी बैठकीत केला. आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक, प्रभात चौक उड्डाणपूल परिसरासह शहरातून जाणार्‍या महामार्गावरील अपघातप्रवण भागांमध्ये तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उड्डाणपुलांवरील पावसाच्या पाण्याचा निचरा, ड्रेनेज होल तसेच संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली.

बायपासच्या पुलाच्या भरावाची तांत्रिक चौकशी करा
पाळधी-तरसोद बायपासवरील पुलाचा भराव अल्पावधीत खचल्याच्या घटनेचीही स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी देशमुख यांनी केली. कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, गुणवत्ता नियंत्रण, तांत्रिक देखरेख तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकार्‍यांची भूमिका तपासली जावी, असे बैठकीत देशमुख यांनी सांगितले.

निकृष्ट कामाने संताप
वर्षभरापूर्वी पाळधी-जळगाव नवीन हायवे (बायपास) रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर रोड खुला करण्यात आला. अ‍ॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या रस्त्याचे काम केले मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे पहिल्या पावसात पाळधी ते जळगाव जाणा-या रोडवरील बांधण्यात आलेल्या ओव्हरब्रिजचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व पुलाची माती खचली. संभाव्य धोका ओळखून पोलीस प्रशासनाने तात्पुरती खबरदारी म्हणून एक लेन बंद करून वाहतूक दुसर्‍या लेनवरून सुरू ठेवली.

30 रोजी पुन्हा अपघातात प्रौढाचा मृत्यू
30 ऑगस्ट रोजी रात्री पाळधी-जळगाव जाणार्‍या नवीन हायवेवर ममुराबाद ते आसोदा गावाच्या बायपास (सर्व्हिस रोड) दरम्यान एक ठिकाणी मोटर अपघात झाला. एका लेनवर ट्रक (क्रमांक एम.एच.05 डी.के.5314) व तवेरा वाहन (क्रमांक एम.एच.48 पी.0755) या दोन वाहनाचा मोटर अपघात झाला. या अपघातात शांताराम केशव पाटील (58, रा.शिंदखेडा, ता.रावेर) यांचा मृत्यू झाला.

निष्पाप नागरिकांच्या बळी घेणार्‍या कंत्राटदारासह कंपनी मालकाविरोधात गुन्हा
निष्पाप नागरिकांचा बळी घेणार्‍या ग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी.एम.दत्ता आणि इतर साईट अधिकार्‍यांविरोधात पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

आर्थिक फायद्यासाठी केले निकृष्ट काम
‘ग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने तसेच खड्डे न बुजवल्याने महामार्गावर अपघाताची मालिका कायम आहे. पाळधी ते जळगाव असा नवीन हायवे (बायपास) रोडचे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे तसेच ओव्हरब्रिजचे एक वर्षाचे आत मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून अपघात झाल्याचा ठपका संबंधित कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !