एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण : नंदुरबारमधून ऋतुजा पाटीलला अटक
77 ते 78 प्रश्न परीक्षेत आल्याचा संशय; व्हॉट्सअॅप चॅटमधून महत्त्वाचे धागे
नंदुरबार (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता नंदुरबारपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अमृत पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिला मुंबई गुन्हे शाखेने नंदुरबार येथील तिच्या राहत्या घरातून अटक केली आहे. परीक्षेपूर्वी ऋतुजाला मिळालेल्या प्रश्नसंचातील तब्बल 77 ते 78 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. याशिवाय प्रश्न मिळवण्यासाठी 12 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याच्या संशयाचाही तपास सुरू आहे.
व्हॉट्सअॅप चॅटमधून तपासाला महत्त्वाचे धागे
ऋतुजाचे मैत्रिणीसोबतचे व्हॉट्सअॅप संभाषण या प्रकरणाच्या तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरत असल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या कालावधीत झालेल्या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संभाषणातून ऋतुजा, तिचे वडील अमृत पाटील, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि अन्य व्यक्तींमधील संपर्काबाबत तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे धागे मिळाल्याची चर्चा आहे.

मुलीच्या परीक्षेसाठी 12 लाख रुपये खर्च केल्याचा संशय
अमृत पाटील हे मुख्याध्यापक असल्याची प्राथमिक माहिती असून मुलीला औषध निरीक्षक बनवण्यासाठी प्रश्न मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी 12 लाख रुपये खर्च केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. यातील काही रक्कम कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचा संशय आहे. या व्यवहाराची आर्थिक बाजू तपासली जात आहे. मुलीच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम या कामासाठी वापरण्यात आल्याची माहिती आहे.
10 प्रश्न चुकीचे सोडवण्याचा सल्ला?
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ऋतुजाला मिळालेल्या प्रश्नांपैकी बहुतांश प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता असल्याने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास संशय निर्माण होऊ नये, यासाठी तिला काही प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
294 प्रश्नांमधून प्रश्न बाहेर काढल्याचा संशय
तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातील तब्बल 294 प्रश्न आरोपी अधिकार्यांनी चोरल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. यातील काही प्रश्न आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात परीक्षार्थींपर्यंत पोहोचवण्यात आले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या 294 प्रश्नांपैकी प्रत्यक्षात किती प्रश्न कोणत्या उमेदवारांना देण्यात आले, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.
चॅटमधून मयूर ठाकरेचा धागा
ऋतुजाच्या व्हॉट्सअॅप संभाषणातून मयूर ठाकरे याचे नावही तपासात पुढे आले आहे. तो या कथित पेपरफुटीच्या साखळीतील दुवा म्हणून काम करत होता का, याची चौकशी केली जात आहे. प्रवीण पाटील यांच्याकडून उर्वरित पैशांची मागणी होत असल्याने अमृत पाटील चिंतेत असल्याचे ऋतुजाने मैत्रिणीला सांगितल्याचे संभाषणातून दिसून येत असल्याची माहिती आहे मात्र या व्यवहाराचा नेमका उद्देश आणि त्याचा पेपरफुटीशी थेट संबंध आहे का, याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
ब्रेकअपमुळे प्रकरणाला वाचा फुटल्याचा संशय
या प्रकरणात अटकेत असलेल्या गौरव उर्फ लोकेश पाटील याचे ऋतुजासोबत पूर्वी प्रेमसंबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. परीक्षेनंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ऋतुजाने लग्नास नकार दिल्याने, ती भविष्यात अधिकारी होईल या रागातून गौरवने कथित पेपरफुटी प्रकरणाची माहिती उघड केल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. या दाव्याचीही चौकशी सुरू आहे.
सहा दिवसांत तिसर्यांदा मुंबईचे पथक नंदुरबारमध्ये
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेचे तपास पथक सहा दिवसांत तिसर्यांदा नंदुरबारमध्ये दाखल झाले आहे. प्रकरणातील काही संशयितांना सोबत आणून त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अमृत पाटील यांना सोबत घेऊन तपास पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, ती कोणाकोणापर्यंत पोहोचली आणि आर्थिक व्यवहाराची साखळी किती मोठी आहे, याचा उलगडा करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.


