भुसावळात 28 रोजी भुलाबाई महोत्सव 2026 चे भव्य आयोजन
केशव स्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळचा संयुक्त उपक्रम
भुसावळ (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : केशव स्मृती प्रतिष्ठानव शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘भुलाबाई महोत्सव 2026’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सोमवार, 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील संत सेना महाराज हॉल, प्रीमियर हॉटेलच्या मागे, जामनेर रोड येथे करण्यात आले आहे. स्थानिक लोकपरंपरा आणि संस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देतानाच महिलांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे.
तीन गटात सहभागी होता येणार
महोत्सवात वयोगटानुसार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान गट (5 ते 10 वर्षे), मोठा गट (वय 11 ते 16 वर्षे) तसेच खुला गट (वय 17 वर्षांपुढे) अशा तीन गटांमध्ये सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या कलाकारांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. त्यात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार 100 रुपये आणि तृतीय पारितोषिक दोन हजार 100 रुपये देण्यात येईल तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक एक हजार 100 रुपये ठेवण्यात आले आहे.



25 पर्यंत नाव नोंदणीचे आवाहन
महोत्सवात सहभागी होणार्या प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी पाच मिनिटांचा वेळ मिळेल शिवाय वेळ संपल्यानंतर घंटा वाजवून वेळ संपल्याचे सूचित केले जाणार आहे. स्पर्धेत गायन, नृत्य, वेशभूषा, सांघिकता आणि सामाजिक संदेश या निकषांवर गुणांकन केले जाईल शिवाय प्रत्येक संघामध्ये गायक व वादकांसह 12 ते 15 जणांचा सहभाग अपेक्षित आहे. खुल्या गटातील संघांना लोकसंस्कृतीच्या अनुषंगाने कानबाई, नागपंचमी, श्रावण सोमवार, गौरी-गणपती आदी विषयांवर संदेश देणार्या गाण्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्वतः तयार केलेल्या तसेच बोलीभाषेतील गाण्यांना, विशेषतः भुलाबाईशी निगडित गीतांना विशेष उत्तेजनार्थ बक्षिसांची योजना ठेवण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक संघाला प्रमाणपत्र देण्यात येणार असून, प्रत्येक संघासाठी सहभाग मोफत आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
नाव नोंदणीसाठी येथे साधा संपर्क
नाव नोंदणीसाठी अनिता आंबेकर (96230-37418), सोनल महाजन (91308-38468), जयश्री चौधरी (91588-23288), वैशाली सेतवाल (95118-86655), राजश्री बादरशाह (86007-83976), दीपक पाटील (जोगलखेडा) (90228-75627) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कलागुणांना व्यासपीठ व लोकसंस्कृतीचे जतन होणार
भुलाबाई महोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक लोककला, संस्कृती आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या. शहर व ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासह पारंपरिक लोकसंस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने दरवर्षी महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद करीत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
