हिंदी भाषा म्हणजे सभ्यता, संस्कारासह संस्कृतीचा समन्वय साधणारी भाषा : प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे
भुसावळ (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : हिंदी ही सामान्य जनतेची भाषा असून या भाषेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तींच्या संवेदना, आशा, आकांक्षा आणि अपेक्षा प्रभावीपणे व्यक्त होतात. भाषेमुळेच मानवाची प्रगती झाली असून सभ्यता, संस्कृती आणि संस्कार यांचे जतन हिंदी भाषेच्या माध्यमातून होते, असे विचार प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त हिंदी सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, हिंदी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील, हिंदी विभागातील प्रा.डॉ.मनोज पाटील, इतिहास विभागप्रमुख डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.डॉ.राजेंद्र तायडे, मराठी विभागाचे डॉ.दीनानाथ पाठक, प्रा.मनोहर गायकवाड, डॉ.प्रियांका महाजन, प्रा.डॉ.किरण समर्थ आदी उपस्थित होते.



संवेदना होतात प्रभावीपणे व्यक्त
हिंदी विभाग प्रमुख डॉ.डी.एन.पाटील यांनी स्व.मधुकरराव चौधरी यांनी हिंदी भाषेला विश्वभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचे सांगितले. हिंदी भाषेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या भावना व संवेदना प्रभावीपणे व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक प्रा.डॉ.मनोज पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा.कविता पांडव यांनी तसेच आभार प्रा.डॉ.राजेंद्र तायडे यांनी मानले. कार्यक्रमास हिंदी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे आयोजन
हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने सुंदर हस्तकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाविद्यालयातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख डॉ.डी.एन.पाटील यांनी केले आहे.
