रावेर तहसीलसमोर केळी उत्पादक शेतकर्यांचे धरणे आंदोलन
केळी पीक विमा व वादळामुळे झालेली नुकसान भरपाईची मागणी
रावेर (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : वादळामुळे केळीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्यांनी रावेर तहसीलदार कार्यायलाबाहेर धरणे आंदोलन छेडले. सुनील कोंडे यांच्या नेतृत्वात आयोजित आदोंलनात रावेर तालुकाभरातील केळी उत्पादक तथा विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत नुकसान भरपाई व पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
तीन महिने उलटूनही दखल नाही
गत जून महिन्यात 1, 4 व 6 जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे केळी उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे करण्यात आल्यानंतर यामध्ये सरकारी मदत मिळेल, अशी आशा शेतकर्यांना लागून होती मात्र तीन महिने उलटल्यावरही त्याबाबत कुठलाही शासन निर्णय होत नसल्यामुळे शेतकर्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. यासोबतच पीक विम्याचे मंजूर महसूल मंडळ अजूनही जाहीर करण्यात आलेले नसून या सोबतच 14 हजार शेतकर्यांच्या पिकविमा मंजूर क्षेत्रात कमी क्षेत्र दाखवलेले असल्याने त्या संदर्भातील ही कुठलीही दुरुस्तीची माहिती पीक विमा कंपनीतर्फे दिली जात नाही. या सर्वांचा रोष म्हणून या सर्वांची त्रृटी दूर करून तात्काळ खात्यात शेतकर्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम मिळण्यासाठी रावेर तहसील कार्यालयासमोर सुनील कोंडे यांच्या नेतृत्वात केळी उत्पादक शेतकर्यांतर्फे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले.



अधिकार्यांनी घेतल्या भेटी
रावेरचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी वैभव पाटील, मनोहर पाटील, भगवान पाटील यांच्यासह अन्य अधिकार्यांनी आंदोलकांची भेट घेत पीकविमा कंपनीचे नाशिक विभागीय प्रमुख सोमेश देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा करून दिली. दरम्यान, पुण्यातील कृषी आयुक्तालय 15 रोजी बैठक असून त्यामध्ये आपल्या आंदोलनाचा मुद्दा व निवेदन आम्ही कंपनीला पाठवत असून आठवडाभरामध्ये यामध्ये काही जाहीर करता येईल का?? यासाठी आम्ही विनंती करणार आहोत, असे यावेळी देशमुख यांनी सांगितले. याबाबत शेतकर्यांचे समाधान झाल्याने धरणे आंदोलन निवेदन देऊन मागे घेण्यात आले. यावर लवकर तोडगा न निघाल्यास यापुढील आंदोलन रस्त्यावर उतरून करण्यात येईल व यास प्रशासन जबाबदार राहील याबाबत अधिकार्यांना बजावण्यात आले.
यांचा धरणे आंदोलनात सहभाग
यावेळी धरणे आंदोलनासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.धनंजय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, माऊली हॉस्पिटलचे डॉ.संदीप पाटील, सी.एस.पाटील, शेतकरी संघटनेचे मधुकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिंधू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाय.एस.महाजन, माजी तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ.सुरेश पाटील, बाजार समिती संचालक सोपान पाटील, गणेश महाजन, राजेंद्र चौधरी, उमाकांत महाजन, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, निंभोर्याचे माजी सरपंच डिगंबर चौधरी, गुणवंत भंगाळे, सुधीर मोरे, विवेक बोंडे, गिरीश नेहेते, योगेश कोळंबे, विष्णू भिरुड, सतीश पाटील, समाधान सावळे, दीपक महाजन, गोपाळ भिरुड, राकेश बर्हाटे, कन्हैया भारंबे, शेख नाजीम, रफिक शेठ, प्रफुल्ल बोंडे, किरण गाजरे, संजय गाजरे, राहुल टोके, भूषण महाजन, स्वप्नील गारसे, विनोद पाटील, प्रशांत बोरोले, ललित पाटील, ललित भंगाळे, अॅड.जे.जी.पाटील, राजेंद्र धनगर, पंकज पाटील, प्रकाश पाटील, राकेश घोरपडे, मोहन बोंडे, राजेंद्र पाटील यांच्यासह अन्य केळी उत्पादकांनी पाठिंबा दर्शविला.
अधिकार्यांना केळीची भेट
या धरणे आंदोलनावेळी शेतकर्यांच्या भेटीसाठी आलेल्या अधिकार्यांना अजंदा येथील केळी उत्पादक शेतकरी सुरेश पाटील यांनी आणलेली केळी शेतकर्यांनी अधिकार्यांना भेट देत आमच्या मागण्या शासन दरबारी कळविण्याबद्दल विनंती केली.
