चोरीच्या घटनांविरोधात जिल्हाभर विशेष मोहीम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी, वीजतारा व घरफोड्यांच्या घटनांची गंभीर दखल ; पोलीस व महावितरणला संयुक्त कारवाईचे निर्देश


जळगाव (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी, वीजतारा, वीज साहित्य तसेच घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबवावी. वारंवार चोरी होणार्‍या भागांची स्वतंत्र नोंद करून तेथे रात्रीची गस्त वाढवावी आणि पोलीस व महावितरणने समन्वयाने ठोस व परिणामकारक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील वीज तारा व विद्युत साहित्य चोरीस आळा घालण्यासाठी तात्काळ उपयोजना करण्याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड परिसरातील वारंवार होणार्‍या चोरीच्या घटनांमुळे शेतकर्‍यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता बैठकीत मांडली. शेतकर्‍यांच्या मागणीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यासह रावेर तालुक्यातील वनगाव,तासखेडा परिसरातील नदीकाठावरील विद्युत मोटारींच्या चोर्‍या, खिर्डी-निंबोल भागातील घरफोड्या, मुक्ताईनगर तालुक्यातील वीजतारा व वीज साहित्याच्या चोर्‍या तसेच बोदवड शहरातील घरफोड्यांचा आढावा घेण्यात आला.

वाढत्या चोर्‍यांनी शेतकरी संकटात
शेतकर्‍याची मोटार चोरीला जाणे म्हणजे केवळ एका वस्तूची चोरी नाही. मोटार गेली की त्याचे सिंचन थांबते, पीक धोक्यात येते आणि आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यावर पुन्हा आर्थिक भार पडतो. त्यामुळे अशा घटनांकडे किरकोळ गुन्हा म्हणून पाहू नका, तसेच चोरीच्या घटनांमध्ये केवळ आरोपी पकडण्यापुरता तपास मर्यादित ठेवू नका. चोरीचा माल शेवटी कुठे जातो, तो कोण खरेदी करतो किंवा अन्य माध्यमातून त्याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि यामागे एखादी संघटित टोळी अथवा साखळी कार्यरत आहे का ? याच्या मुळापर्यंत जा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले.

नियमित गस्त घालावी 
रावेर-मुक्ताईनगर-बोदवड भागातील वारंवार होणार्‍या चोरीच्या घटनांचा एकत्रित तपास करण्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली विशेष पथक कार्यरत करावे. चोरीप्रवण ठिकाणे निश्चित करून नियमित पेट्रोलिंगबरोबरच संशयित व्यक्ती व वाहनांवर लक्ष केंद्रित करावे. नदीकाठच्या तसेच नदीलगतच्या गावांमध्ये आवश्यक असल्यास बोटीद्वारे गस्त घालण्याची व्यवस्था करा. चोरी रोखण्यासाठी जे आवश्यक आहे ते करा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

महावितरणने वारंवार वीजतारा व वीज साहित्य चोरी होणारे मार्ग आणि संवेदनशील ठिकाणे निश्चित करावीत. अशा भागांची माहिती पोलिसांना उपलब्ध करून द्यावी. पोलीस व महावितरणने संयुक्त यंत्रणा उभी करून तातडीने माहितीची देवाणघेवाण करावी आणि चोरीच्या घटनांवर ‘क्शन मोड’मध्ये काम करावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

सिंचनाची वाढली अडचण
शेतकर्‍यांचा प्रश्न मांडताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, विद्युत मोटारी, वीजतारा व साहित्य चोरीला गेल्यानंतर शेतकर्‍याला एकाच वेळी आर्थिक फटका आणि सिंचनाची अडचण सहन करावी लागते. त्यामुळे केवळ गुन्हा नोंदवून थांबण्याऐवजी चोरी करणार्‍यांपासून ते चोरीचा माल विकत घेणार्‍यांपर्यंत संपूर्ण साखळीवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पोलीस आणि महावितरण विभागाने परस्परांवर जबाबदारी न ढकलता समन्वयाने काम करावे. वारंवार तारा चोरी होणार्‍या भागात संयुक्त गस्त, संशयित हालचालींवर नजर आणि स्थानिक यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळविण्याची व्यवस्था उभी करावी. शेतकर्‍यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल अशी कारवाई दिसली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी या विषयाशी संबंधित विविध मुद्दे बैठकीत मांडले.

यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी जिल्ह्यातील कॉपर चोरी, विद्युत मोटारी व वीजतारा चोरीच्या घटनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. जिल्ह्यात कोणकोणत्या भागांत अशा चोरीच्या घटना घडल्या आहेत, त्यांचे स्वरूप, संवेदनशील ठिकाणे, पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच या घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी महावितरणकडून अपेक्षित असलेले सहकार्य याची माहिती त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे बैठकीत मांडली. चोरीच्या घटनांचा मागोवा घेणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि पोलीस व महावितरण यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी विविध उपाययोजनांची माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !