भडगाव हादरले : 800 रुपयांच्या वादातून मामेभावाचा खून

विक्षिप्त आरोपीने मृताचे दात तोडून बॅगेत ठेवले ; खाण्यासाठी बाळगली दोन जिवंत कबतूरे


भडगाव (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या 800 रुपयांच्या पैशांवरून झालेल्या वादातून पारधी समाजातील एका तरुणाचा त्याच्याच आत्ते भावाने दगडाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना भडगाव परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

मृताचे नाव धर्मा जुगा पवार (40) असून आरोपीचे नाव जुगा कांतिलाल पवार (वय 30) असल्याची माहिती आहे. दोघेही गावोगावी फिरून बनावट रुद्राक्ष विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी धर्मा पवार यांनी सुमारे 800 किंमतीचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर दोघे स्टेशनजवळ सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास दारू पिण्यासाठी बसले. यावेळी पैशांच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि आरोपीने धर्मा पवार यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलिसांना आरोपी आढळला
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शेताजवळ काही कुत्रे भुंकत असल्याचा आवाज पोलिसांना ऐकू आला. त्या दिशेने पोलिस गेले असता आरोपी दारूच्या नशेत तेथे बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीजवळील बॅगेत मृताच्या तोंडातील काही दात तोडून ठेवलेले आढळले. त्याच बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळून आली. आरोपीने ही कबुतरे खाण्यासाठी आणल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

 

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !