भुसावळातील एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला मध्यरात्री आग

दोन गायींचा मृत्यू : आगीचे कारण अस्पष्ट : कोट्यवधींचे नुकसान


भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : एमआयडीसी परिसरातील एका केमिकल बनवणार्‍या कंपनीला सोमवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीची झळ शेजारीच असणार्‍या एका ट्रान्सफार्मर कंपनीलाही बसली. या आगीत दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकले नसलेतरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास लागली आग
सूत्रांच्या माहितीनुसार, एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक डी.67 मध्ये एन.आर.जे.फार्मा ही कंपनी असून सोमवारी रात्री 11.30 ते 12 वाजेच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. केमिकलमुळे पाहता-पाहता आग सर्वदूर भडकली व शेजारीच असलेल्या एका ट्रान्सफार्मर कंपनीलाही आगीची झळ बसल्याचे सांगण्यात आले. भुसावळ पालिकेसह जिल्हाभरातून अग्निशमन दलाच्या बंबांनी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळी दोन गायी मृतावस्थेत आढळून आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले. आग आटोक्यात आणण्यासाठी जळगाव अग्निशमन दल, भुसावळ नगरपरिषद, वरणगाव नगरपरिषद, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र तसेच वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन बंबांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न केले. विविध ठिकाणांहून दाखल झालेल्या अग्निशमन पथकांनी अथक प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.

जिल्हाभरातून आले अग्निशमन बंब
आगीची माहिती मिळताच भुसावळ पालिकेच्या बंबांनी 16 अधिक फेर्‍या केल्या. भुसावळ अग्निशमन दलाचे रवी पाटील ,राजू कोळी, धनसिंग सपकाळे, हितेश रायपूरकरख, विजय मनोरे, राजू ठोके, डिगंबर येवले, विकास वाघूळदे, गौरव सपकाळे यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले तर जिल्ह्यातील जळगाव, वरणगाव आदी भागातून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कोट्यवधींचे नुकसान
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसलेतरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज असून या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे समजते.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !