भुसावळात चारित्र्याच्या संशयातून महिलेची हत्या : पतीसह नणंदेला जन्मठेप

भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल : तत्कालीन सहा.अधीक्षक निलोत्पल यांनी केला गुन्ह्याचा यशस्वी तपास


भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या करण्यात आल्याची घटना बाजारपेठ हद्दीतील कुंभारवाडा भागात 2017 मध्ये घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पतीसह नणंदेला भुसावळातील अतिरीक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनिल रतन साळुंके (38) व सुनीता देवराम पवार (40, पांडुरंग टॉकीजसमोर, कुंभारवाडा, भुसावळ) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

असे आहे प्रकरण
भुसावळातील पांडुरंग टॉकीजसमोर राहणार्‍या उषा अनिल साळुंके (32) या विवाहितेची 28 जुलै 2017 रोजी सकाळी सुमारे 9 ते 10.15 वाजेदरम्यान आरोपींनी चारित्र्यावर संशय घेत संगनमताने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत हत्या केली होती. आरोपींनी अल्पवयीनाला पोलीस ठाण्यात पाठवून सुरूवातीला हा प्रकार महिलेला आलेल्या फिटस्मुळे झाल्याचे सांगितले मात्र पोलीस अधिकार्‍यांनी केलेला कौशल्याने तपास तसेच महिलेला मारहाण होत असताना शेजार्‍यांनी ऐकलेला आवाजानंतर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिस अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी व पती अनिल साळुंके व मृताची नणंद सुनीता पवार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यशस्वीरित्या केला. सरकारी अभियोक्ता म्हणून विजय खडसे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

दोन्ही आरोपींना जन्मभर कारवास
न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 302 सह 34 अन्वये दोषी ठरवले. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 235(2) नुसार त्यांना जन्मभर सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रत्येकी पाच रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात एकूण 34 साक्षीदारांपैकी 16 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. दोषारोपपत्र क्रमांक 59/2017 दिनांक 26 ऑक्टोबर 2017 रोजी सादर करण्यात आले होते. 2 जुलै 2018 रोजी आरोप निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी अनिल साळुंके याने 30 जुलै 2017 ते 4 ऑक्टोबर 2018, तर सुनिता पवार हिने 30 जुलै 2017 ते 12 सप्टेंबर 2018 या कालावधीत भोगलेला स्थानबद्धतेचा काळ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 428 अन्वये शिक्षेतून वजा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !