दीपनगर ओव्हरब्रिजजवळ भीषण अपघात : भरधाव कंटेनरने चिरडल्याने भुसावळातील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार

ट्रकच्या चाकात दुचाकी अडकल्यानंतरही वाहन नेले फरफटत : चालकाला नशिराबादजवळ बेड्या


भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : भुसावळ शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील दीपनगर ओव्हरब्रिजजवळ मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडल्याने भुसावळातील तरुणासह प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे कंटेनरच्या पुढील चाकात मोपेड अडकूनही चालकाने वाहन न थांबवता काही अंतरापर्यंत फरफटत नेले. वाहनधारकांनी कंटेनरचा पाठलाग केला मात्र चालकाने वाहन सुसाट पळवले. बाजारपेठ व तालुका पोलिसांनी धाव घेतल्यानंतर नशिराबाद पोलिसांना सूचित केल्यानंतर नाकाबंदीत कंटेनर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या तर कंटेनर जप्त करण्यात आला.

दरम्यान, मिर्झा सलीम बेग (61, भुसावळ) व देवेंद्र चौधरी (23, मूळ रा.आग्रा, ह.मु.भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. मिर्झा हे रेल्वेतून सेवानिवृत्त झाले असून देवेंद्र हा रेल्वेत रोजंदारी तत्वाने कामाने असल्याची माहिती मिळाली. अर्पित सिंग (26, रायबरेली) या कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

भरधाव कंटेनरने दुचाकी चालकांना चिरडले
प्राथमिक माहितीनुसार, मोपेडवरून दोघे वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनर क्रमांक (यु.पी.32 एक्स.एन.4457) ने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की मोपेडसह दुचाकीस्वार ट्रकच्या चाकात अडकले व कंटेनर चालकाने वाहन न थांबवता तसेच सुसाट वेगाने चालवत नेले. रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍यांनी हा अपघात पाहिल्यानंतर भुसावळ बाजारपेठ व तालुका पोलिसांना सूचित केले तर कंटेनर चालकाचा पाठलाग केला मात्र तो सुसाट वेगाने नशिराबादच्या दिशेने पळाला.

नशिराबादला नाकाबंदी करीत कंटेनर पकडला
नशिराबादच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे यांना बाजारपेठ पोलिसांनी अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने महामार्गावर नाकाबंदी केली व कंटेनर क्रमांक (यु.पी.32 एक्स.एन.4457) येताच त्यास अडवून चालक अर्पित सिंग (26, रायबरेली) यास ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलिसांना सूचित केल्यानंतर कंटेनर व चालकाला ताब्यात घेण्यात आले.

मयत भुसावळसह आग्रा येथील रहिवासी
नहींच्या रुग्णवाहिकेतून दोघा अत्यवस्थ अवस्थेतील जखमींना ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मिर्झा सलीम बेग (61, भुसावळ) व देवेंद्र चौधरी (36, मूळ रा.आग्रा, ह.मु.भुसावळ) अशी मृतांची नावे असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !