भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याचा खून : दोन संशयीतांना अटक

अल्पवयीनाची बालकारागृहात रवानगी तर संशयीताला दोन दिवसांची कोठडी


 

भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : भुसावळातील रेल्वे कर्मचारी तुषार गोविंद सोनवणे (36, रा. श्रावस्तीनगर, भुसावळ) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी शहरातील आनंदराव कॉलनी पाटीलमळा परिसरात घडली होती. या घटनेत सुरूवातीला अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले होते मात्र या खुनात आणखी काही संशयीताचा सहभाग असल्याचा संशय त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त करीत सखोल चौकशीची मागणी केली होती. पोलिसांच्या चौकशीत या खुनात अल्पवयीनासह अन्य एकाचा सहभाग आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

खुनातील आरोपींची संख्या झाली तीन
राहुल राजेश नेहेते (रा. आनंदनगर, शिवगंगा चौक, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव असून त्यास मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या खून प्रकरणात आता आरोपींची संख्या तीन झाली असून त्यातील दोन अल्पवयीन असून ते बालसुधारगृहात आहेत.

काय आहे प्रकरण ?
रेल्वे कर्मचारी असलेल्या तुषार सोनवणेचे अल्पवयीन संशयीतााच्या आईशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने व फोनवर नेहमीच बोलणे होत असल्याचा 17 वर्षीय अल्पवयीनाला राग होता त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वीच हत्येचा कट रचला. 10 सप्टेंबरच्या रात्री संशयीताने तुषारला घरी वडिल नसल्याचे सांगत येण्याच्या निमित्ताने बोलावून दुचाकीवरून बसवले व काही अंतरावर आल्यानंतर तुषारला दुचाकी चालवण्यास दिली. आनंदराव कॉलनी पाटीलमळा परिसर येताच अल्पवयीनाने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तीन वार तुषारवर केल्याने तो गंभीर जखमी झाला व अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.

अन्य दोन आरोपींचा सहभाग
बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावरनू अल्पवयीनास घटनेच्या दिवशीच ताब्यात घेतले तर तपासादरम्यान सुमारे 11 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी दोघांविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे ठोस पुरावे समोर आल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आले. यामध्ये एक विधी संघर्ष बालक असून दुसरा संशयीत राहुल राजेश नेहेते (रा. आनंदनगर, शिवगंगा चौक, भुसावळ) हा असल्याने त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास मंगळवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !