रोझवा पुर्नवसन गावात घरफोडी : त्रिकूट नंदुरबार गुन्हे शाखेच्या जाळ्यात
चोरट्यांकडून एक लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त : पाच आरोपींचा सहभाग
नंदुरबार (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : तळोदा तालुक्यातील रोझवा पुर्नवसन गावात झालेल्या घरफोडीची उकल करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे उघड आले आहे. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 89 हजार 878 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील रोझवा पुर्नवसन गावातील घरफोडीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला 22 सप्टेंबर 2026 रोजी निर्देश दिल्यानंतर विरसिंग रमेश वसावे (22), भूषण मोज्या पावरा (23) व किसन कोंदा पावरा (55, रोझवा पुर्नवसन नंबर तीन, ता.तळोदा, जि.नंदुरबार) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.
चांदी, सोने आणि रोख रक्कम जप्त
या कारवाईत पोलिसांनी 92 हजार रुपये किंमतीचे 460 ग्रॅम चांदीचे तसेच 87 हजार 878 रुपये किंमतीचे 7.9 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख, असा एकूण एक लाख 89 हजार 878 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार राहुल पांढारकर, विशाल मराठे आणि सचिन सैंदाणे आदींच्या पथकाने केली.




