रावेरात अंगणवाडी सेविकेकडे भरदिवसा घरफोडी : जळगावातील आरोपी 24 तासात जाळ्यात

संशयीत निघाला तक्रारदाराच्या बहिणीचा मुलगा : तीन तोळ्याच्या दागिण्यांसह 50 हजारांची रोकड जप्त


रावेर (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : रावेर शहरात दिवसा घराला कुलूप असल्याची संधी साधून घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणार्‍या आरोपींचा रावेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोध घेतला. शहरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करीत जळगावातील दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराच्या बहिणीच्या मुलानेच ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.

अंगणवाडी सेविकेकडे झाली होती घरफोडी
रावेर शहरातील अंगणवाडी सेविका कल्पना सुभाष वाणी (मधुसूदन मेडिकलसमोर, रावेर) या कामानिमित्त अहिरवाडी येथे गेल्यानंतर घर बंद असताना चोरट्यांनी 20 रोजी सकाळी सात ते दुपारी दोन दरम्यान चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून संधी साधली. चोरट्यांनी दोन लाख रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकीट, एक लाख रुपये किंमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच 50 हजारांची रोकड मिळून एकूण तीन लाख 50 हजारांचा ऐवज लांबवल्याने रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजने दिला ‘क्लू’
तपासादरम्यान सीसीटीव्ही चित्रणात संशयित व्यक्तींच्या हालचाली स्पष्टपणे आढळून आल्या. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांना आरोपी स्पष्ट होताच रितेश रवींद्र नेवे (31, इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्यामागे, जळगाव) व गजेंद्र सोपान चौधरी (38, ममुराबाद इंदिरानगर ईदगाह रोड, जळगाव) यांना अटक केल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली. आरोपींकडून 50 हजारांची रोकड व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर निरीक्षक संदीप पाटील, एपीआय हरिदास बोचरे, गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी, विकार शेख आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !