बोदवड तालुक्यात शॉक लागल्याने महावितरणच्या कर्मचार्याचा मृत्यू
बोदवड (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : बोदवड तालुक्यातील बोरगाव येथे विद्युत पोलवर काम करीत असताना विजेचा धक्का लागून खाली पडल्याने महावितरण कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार, 23 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलवरून पडताच मृत्यू
प्रवीण सोपान लरबडे (34, रा. वाकी, ता.बोदवड) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. प्रवीण लरबडे हे वीज वितरण कंपनीच्या शेलवड कक्षात कार्यरत होते. बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजता ते बोरगाव येथे विद्युत खांबावर वायर जोडणीचे काम करीत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने ते खांबावरून खाली पडले व डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंद्रशेखर संजय उगले (27) यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.




