यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या एसी बसला भीषण आग ; 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नोएडाहून महोबाला जात होती स्लीपर बस ; 35 प्रवासी होते, अनेकांनी खिडक्या तोडून वाचवला जीव


नोएडा (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : यमुना एक्सप्रेसवेवर मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. नोएडाहून महोबाला जाणार्‍या स्लीपर एसी बसला अचानक आग लागली आणि काही क्षणांत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या भीषण अग्निकांडात नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या बसमध्ये सुमारे 35 प्रवासी होते. आग लागल्यानंतर अनेक प्रवाशांनी खिडक्या तोडून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचवला.

अचानक लागली आग
बुधवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ‘राज कल्पना ट्रॅव्हल्स’ची बस यमुना एक्सप्रेसवेवरून जात असताना अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी आली. काही क्षणांत आगीने संपूर्ण बसला वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे 45 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

आग विझल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बसचा मागील भाग कापून आत प्रवेश केला. त्यावेळी आठ पुरुष आणि एका महिलेचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शॉर्ट सर्किट की फटाक्यांचा आवाज?
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी आग लागल्यानंतर बसमधून फटाके फुटल्यासारखे आवाज ऐकू आल्याचे सांगितले. त्यामुळे आगीच्या कारणाबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

दहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी
घटनेनंतर सुमारे दहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी बचावकार्य सुरू केले. ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवे परिसरातील सुमारे 20 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, काही प्रवासी खासगी वाहनांमधून घटनास्थळावरून निघून गेले. एका महिला प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे नोएडा-आग्रा मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली. पहाटेच्या सुमारास मार्गिका खुली करून वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !