सुझलॉन पवन ऊर्जा टॉवरवर दरोडा टाकणारी टोळी जाळ्यात

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तीन आरोपींकडून सात लाखांचा मुद्देमाल जप्त


नंदुरबार (शुक्रवार, 24 सप्टेंबर 2026) : नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रीहट्टी शिवारातील सुझलॉन पवन ऊर्जा टॉवरवर दरोडा टाकून कॉपर केबल व इतर साहित्य लंपास करणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किंमतीची 300 किलो तांब्याची तार तसेच वाहनासह एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

7 सप्टेंबरला पडला होता दरोडा
सोमवार, 7 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास इंद्रीहट्टी शिवारातील सुझलॉन टॉवर क्रमांक के.355 येथे 10 ते 15 जणांनी तोंडाला व अंगावर काळे कपडे परिधान करून घटनास्थळी प्रवेश करीत तक्रारदार व साक्षीदारांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेत त्यांना सुमारे दोन तास बांधून ठेवले तसेच टॉवरचा दरवाजा मशिनच्या सहाय्याने कापून टॉवरमधील कॉपर केबल व इतर साहित्य चोरी करून आरोपी पसार झाले. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 457/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


गोपनीय व तांत्रिक माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तपासादरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा दरोडा धुळे जिल्ह्यातील जामदा परिसरातील अनमोल अशोक भोसले आणि मच्छिंद्र पुंडलिक मासुळे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले.

तीन आरोपींना अटक
पथकाने अनमोल अशोक भोसले (26, जामदा, ता.साक्री), मच्छिंद्र पुंडलिक मासुळे (29, हट्टी, ता.साक्री) व शकील लतीफ खाटीक (39, गरीब नवाज कॉलनी, दोंडाईचा) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तीन लाख रुपये किंमतीची 300 किलो तांब्याची तार तसेच चार लाखांचे गुन्ह्यात वापरेलेले वाहन व इतर साहित्य असा एकूण सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील उर्वरीत आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचाही शोध सुरू करण्यात आला आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील, मुकेश तावडे, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, दिनेश वसुले, योगेंद्र सोनार, अंमलदार सचिन सैंदाणे, अभय राजपूत, विनोद पाटील, अनिल नागरगोजे आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !