लाच देण्याचा इशार्यानंतर खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात तर वायरमन निसटला
नाशिक (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : शेतातील ट्रान्सफार्मरमधून वीज घेतल्याने कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची मागणी करून दहा हजार रुपये वायरमनने स्वीकारले मात्र त्यानंतर पुन्हा पाच हजारांसाठी तगादा लावणर्या वायरमनवर एसीबीचा ट्रॅप आला मात्र लाच देण्याच्या इशार्यानंतर खाजगी पंटराला पकडण्यात यश आले तर वायरमन मात्र सापळ्यादरम्यान पसार झाला. ही कारवाई शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कृष्णा काशीनाथ ढोमसे (30, गोरठाण, शिरवाडे वणी, ता.निफाड) असे अटकेतील खाजगी पंटराचे नाव आहे तर वायरमन जितेंद्र ठाकूर मात्र पसार झाला आहे.
असे आहे लाच प्रकरण
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या चांदवड तालुक्यातील शेतात शेती व्यवसायासाठी ट्रान्सफॉर्मरमधून वायरद्वारे वीज घेतली जात होती. ऑगस्ट 2026 मध्ये आरोपी वायरमनने तक्रारदारावर कारवाई करण्याची भीती दाखवत ती कारवाई टाळण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 10 हजार रुपये तक्रारदार यांनी यापूर्वी दिले होते. यानंतर 24 सप्टेंबर रोजी आरोपी वायरमन यांनी तक्रारदारांच्या भावाशी संपर्क साधून उर्वरित पाच हजार रुपये देण्याचा निरोप दिला. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाच देण्याचा इशारा अन आरोपी जाळ्यात
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. खाजगी पंटर असलेल्या मेडिकल शॉप चालकाकडे लाचेची पाच हजारांची रक्कम आरोपी वायरमनने देण्याचा इशारा केला मात्र पथकाला पाहून वायरमन पसार झाला तर खाजगी पंटर मात्र जाळ्यात अडकला.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी यांनी केले. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक मेघा सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकरणाच्या पुढील तपासाची कार्यवाही सुरू आहे.



