टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाची बैठक
पाणीपुरवठा, चारा, पीक नोंदणी व पंचनाम्यांबाबत अधिकार्यांना तातडीच्या सूचना
यावल (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील संभाव्य टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार टंचाई कृती आराखड्याबाबत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी पिण्याचे पाणी, शेती, पशुधनासाठी चारा तसेच टंचाईच्या काळात करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यांची होती उपस्थिती
बैठकीस उपविभागीय अधिकारी फैजपूर, रावेर व यावलचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, पर्यवेक्षक व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याचा कृती आराखडा तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. विंधन विहिरी, पाणीपुरवठा योजना तसेच इतर कारणांमुळे निर्माण होणारे बिघाड तातडीने दुरुस्त करून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पीक नोंदणी करण्याचे आवाहन
पावसातील खंडामुळे पिकांवर परिणाम होऊ नये यासाठी पीकनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच जास्तीत जास्त शेतकर्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपवर पीक नोंदणी करावी, यासाठी कृषी व महसूल विभागाने प्रभावीपणे पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पशुधनासाठी आवश्यक चार्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कृषी व महसूल विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी पात्र शेतकर्यांचे पंचनामे प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले. टंचाई परिस्थितीत शासनाच्या सूचनांनुसार सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून तातडीने, प्रभावी व कार्यक्षम उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.