किनगावात एक लाख 30 हजारांचे गोमांस जप्त : सहा जणांविरुद्ध गुन्हा
यावल (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथे गोवंश कत्तलीच्या संशयावरून यावल पोलिसांनी कारवाई करत दोन जिवंत गोवंश, कत्तल केलेले सुमारे 350 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, वजनकाटा तसेच दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास किनगाव येथील गोरसिया नगर भागात करण्यात आली.
सहा जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी रशीद बशीर कुरेशी (40, रा.गौरसिया नगर, किनगाव, ता.यावल), ईस्माईल बिस्मिल्ला कुरेशी (55, रा.मालोद, ता.यावल), समीर सलीम कुरेशी (27, रा.किनगाव), ईस्माईल युनूस कुरेशी (20, रा. किनगाव), इम्तियास खलील कुरेशी (18, रा.किनगाव), अब्यार इब्राहिम कुरेशी (35, रा.किनगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एक लाख 30 हजारांचे गोमांस जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंदाजे 15 हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत गोवंश तसेच अंदाजे 30 हजार रुपये किंमतीचे 150 किलो गोमांस, 36 हजार रुपये किंमतीचे 180 किलो आणि चार हजार रुपये किंमतीचे 20 किलो असे एकूण सुमारे 350 किलो कत्तल केलेले गोमांस आढळून आले. याशिवाय कत्तलीसाठी वापरण्यात येणारी कुर्हाड व सुरी, तराजू-वजनमापे तसेच गोमांस वाहतूक व विक्रीसाठी वापरलेली हिरो कंपनीची डिलक्स मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 ए.पी.3909) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार विठ्ठलराव वाढवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
