धरणगाव आठवडे बाजारातील लुटीची उकल : जळगावातील आरोपीला बेड्या

जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : संशयीत आरोपी जळगावातील रहिवासी


जळगाव (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : धरणगावच्या आठवडे बाजारात नातेवाईक असल्याचे भासवून एका व्यक्तीची लूट करण्यात आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत आरोपीला अटक केली. आरोपीकडून आठ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. दिगंबर कौतीक मानकर (शिवशंकर नगर, आसोदा रोड, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लूट प्रकरण
17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता धरणगावच्या आठवडे बाजारात संशयीत आरोपीने तक्रारदाराला नातेवाईक असल्याचे भासवत त्याच्याकडील साडेआठ हजारांची रक्कम लूटली होती. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व फुटेजच्या आधारे आरोपी दिगंबर मानकरला बेड्या ठोकल्या. आरोपीच्या ताब्यातून आठ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकरिता धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार विष्णू बिर्‍हाडे, हवालदार दीपक माळी, हवालदार रवींद्र पाटील, हवालदार हरिलाल पाटील, हवालदार निलेश सोनवणे, कॉन्स्टेबल राहुल कोळी, हवालदार विलास गायकवाड आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !