दहिगावच्या तरुणाचा फैजपूर साखर कारखान्यासमोर अपघाती मृत्यू
यावल (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा बुधवारी रात्री दहा वाजता मोटरसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला. यावल ग्रामीण रुग्णालयात तरुणाचा मृतदेह आणल्यानंतर गुरुवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिथून अशोक गायकवाड (35) असे मृताचे नाव आहे.
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
मिथून हा तरुण मित्रांसह फैजपूरकडून यावलकडे मोटरसायकने भरधाव वेगात येत असताना मधुकर सहकारी साखर कारखान्यात समोरील रस्त्यावर त्याची अज्ञात मोटरसायकलला धडक झाली. त्यात तो खाली कोसळून मृत पावला तर त्याच्या मागे बसलेले दोन तरुण तेथून पसार झाले. अज्ञात मोटरसायकलस्वारही निघून गेला.
तरुणाला तत्काळ फैजपूर येथील नागरिकांनी डॉ.खाचणे यांचे हॉस्पिटल समोर आणले आणि तेथून भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याबाबतची खबर जगदीश गायकवाड यांनी यावल पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, वडील, तीन मुले व भाऊ असा परिवार आहे.
