लसुनबर्डीतील 39 वर्षीय विवाहितेचे अपहरण
यावल (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : नातवंडाच्या बारस्यानिमित्त जावयाकडे आलेल्या व तिथून पाचोरा येथे परत जाण्यासाठी किनगाव येथून इको गाडीत बसलेल्या 39 वर्षीय विवाहितेचे अज्ञात इसमाने अपहरण केले. याप्रकरणी जावयाच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
किरण महेंद्र बारेला (20, रा.लसुनबर्डी, ता. यावल) यांच्या पत्नीला 20 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. या आनंदोत्सवाच्या व धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची सासू पुनासीबाई केसराम तोरोले ( 39, रा. गाडगेबाबा नगर, जुना अंतुर्ली रोड, पाचोरा) या लसुनबर्डी येथे आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर 23 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास किरण बारेला यांनी आपल्या सासू पुनासीबाई यांना पाचोरा येथे जाण्यासाठी किनगाव बसस्थानक येथून जळगाव जाणार्या एका इको गाडीत बसवून दिले. याच दिवशी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास किरण बारेला यांनी पाचोरा येथे सासरे केसराम हरदास तोरोले यांना फोन करून सासू घरी पोहोचल्या का? याबाबत विचारणा केली मात्र त्या घरी पोहोचल्या नसल्याचा निरोप मिळताच त्यांना धक्का बसला.
नातेवाईक व कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. अखेर अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कुठेतरी डांबून ठेवण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत किरण बारेला यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
