भुसावळात वयोवृद्धेची सोनपोत हिसकावली : त्रिकूट गुन्हे शाखेच्या जाळ्यात
रिक्षा व पोतसह सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त : दोन संशयीत रेकॉर्डवरील गुन्हेगार
भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : बाजारातून घराकडे पायी निघालेल्या वयोवृद्धेजवळ रिक्षा नेवून घरी सोडण्याचा बहाणा करीत आरोपींनी प्रवासादरम्यान वृद्धेच्या गळ्यातील अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र लांबवले. भरदिवसा जबरी लूटीची ही घटना शहर हद्दीतील दगडी पुलाजवळ 27 रोजी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलिसात या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने तीन आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
या आरोपींना अटक
वसीम शेरअली तेली (38, फातेमानगर, एमआयडीसी, जळगाव), मोहम्मद अरबाज अय्युब खान (26, रा.शिवाजी नगर चौक, जळगाव) व वसीम अजमल खान (36, साती बाजार, रेहमान शाह बाबा दर्ग्याजवळ, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या वाट्या व एक लाख रुपये किंमतीची रिक्षा जप्त करण्यात आली.
असे आहे लूट प्रकरण
भुसावळातील पुष्पाबाई सुभाष विसपुते (75, यावल रोड, भुसावळ) या 27 रोजी बाजारातून घराकडे निघाल्यानंतर शहर हद्दीतील दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिराजवळ एक रिक्षा आली व त्यांनी वृद्धेला घरी सोडण्याची भूरळ घालत रिक्षेत बसवली. प्रवासादरम्यान रिक्षामध्ये आधीच असलेल्या संशयीतांनी जबरीने अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लुटून पोबारा केला. याबाबत वृद्धेने गुरुवारी शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या अंगाने तांत्रिक विश्लेषण व परिसरातील सीसीटीव्ही आधारे रिक्षा क्रमांक व संशयीताची माहिती प्राप्त करीत आरोपींना अटक केली. पोलिसांच्या नोंदीनुसार, वसीम शेखअली तेली याच्याविरुद्ध यापूर्वीही चोरीसंदर्भातील एमआयडीसीत दोन तर रामानंदनगर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे तर वसीम अजमल खान याच्याविरुद्धही एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार अकरम शेख, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींच्या पथकाने केली.
