पशू खाद्याआड विदेशी दारूची तस्करी : धुळ्यानजीक 10 लाखांचा साठा जप्त

धुळे गुन्हे शाखेची कारवाई : चार संशयीताविरोधात गुन्हा


धुळे (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : पशू खाद्याच्या आड लपवून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत 20 लाख 50 हजार 320 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत हा अवैध दारू साठा चोपडा, जि.जळगाव येथे आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शानेश्वर वारे यांना गुरुवार, 1 ऑक्टोबर रोजी विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान चौफुली येथे सापळा रचला. संशयीत कंटेनर (एम.एच.14 जी.यु.5553) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता पशू खाद्याच्या आड विदेशी दारूचा साठा नेला जात असल्याचे स्पष्ट झाले.

चोपड्यात येणार होता अवैध दरू साठा
पोलिसांच्या माहितीनुसार हा अवैध दारू साठा विशाल सुरेश ठाणगे (श्रीरामपूर) याने भरून कंटेनर चालक विजय सुरेश ठाणगे (42, रा. वॉर्ड नं. 1, दशमेश नगर, श्रीरामपूर), क्लीनर इसाक नूर शेख (36, रा. वॉर्ड नं. 1, दशमेश नगर, श्रीरामपूर) यांच्या माध्यमातून चोपडा येथील बापू वाणी उर्फ विनोद वसंत देशमुख (चोपडा) याच्याकडे नेण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

गोवा बनावटीचा मद्यसाठा
कारवाईत 10 लाख 50 हजार 320 रुपये गोवा बनावटीची विदेशी दारू तसेच विविध कंपनीची विदेशी दारू तसेच पशू खाद्य तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दहा लाखांचा कंटेनर मिळून 20 लाख 50 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहाडी नगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक दीपक ढोके, अंमलदार शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, संदीप पाटील, सतीश जाधव, मच्छिंद्र पाटील, जितेंद्र अहिरराव, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, राजीव गीते आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !