लाचखोरीच्या दोन प्रकरणांनी शिरूर ठाणे चर्चेत ; दोन पोलीस हवालदारांवर एसीबीची कारवाई
शिरूर (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक न करता मदत करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांत शिरूर पोलिस ठाण्यातील दोन हवालदारांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. शिवाजी ज्योतीराम बनकर यांना 11 हजारांची लाच घेताना तर सतीश नाथाराम मुंढे हे 95 हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर पथकाची चाहूल लागताच पैसे घेऊन पसार झाले, अशी माहिती एसीबीने दिली.
पहिल्या प्रकरणात 11 हजार स्वीकारताना पकडले
पहिल्या प्रकरणातील 29 वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या आई-वडिलांविरुद्ध 19 ऑगस्ट 2026 रोजी शिरूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार शिवाजी बनकर यांच्याकडे होता. तक्रारदार आणि त्यांच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी बनकर यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली. विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. शिरूर पोलिस ठाण्याबाहेरील रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून 11 हजार रुपये स्वीकारताना बनकर यांना पकडण्यात आले.
दुसर्या प्रकरणात 95 हजार स्वीकारून हवालदार पसार
दुसर्या प्रकरणात 59 वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध शिरूर पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास हवालदार सतीश मुंढे यांच्याकडे होता. अटक टाळण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
एसीबीच्या पडताळणीदरम्यान मुंढे यांनी तक्रारदाराला टाकळी हाजी पोलिस चौकीत बोलावले. स्वतःसाठी तसेच वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला एक लाख रुपये आणि नंतर तडजोडीनंतर 95 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.
यानंतर चौकीत सापळा रचण्यात आला. मुंढे यांनी 95 हजार रुपये स्वीकारले मात्र एसीबी पथकाची चाहूल लागताच स्वीकारलेली रक्कम घेऊन अंधाराचा फायदा उठवत ते पसार झाले.
दोन्ही प्रकरणांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
मुंढे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 238 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. बनकर प्रकरणातील कारवाई पोलिस निरीक्षक आसावरी शेंडगे, तर मुंढे प्रकरणातील कारवाई पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली. दोन्ही कारवायांचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी केले. लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.


