जळगावात बांगलादेशी महिलेचे वास्तव्य आढळले
पोलिसांच्या सतर्कतेने प्रकार उघड : गुन्हे शाखेकडून पडताळणी
जळगाव (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेली एक बांगलादेशी महिला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. संबंधित महिलेा मो.अकीजारा अख्तर (25) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
शनिवारी एका महिलेला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एका पोलीस अंमलदाराला ही महिला बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता असल्याचा संशय आल्याने याबाबत तातडीने पोलीस अधीक्षकांना फोन करून माहिती दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेची चौकशी करून तिच्या कागदपत्रांची व ओळखीची पडताळणी केली. या तपासात ती बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
मो.अकीजारा अख्तर (25) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून पतीचे नाव फरहाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिचा संबंध ढाका विभागातील जमालपूर जिल्ह्यातील बक्षीगंज पोलीस ठाणे हद्दीतील बागारचर युनियन, पोस्ट भाटखांडारा या परिसराशी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.


