शेतकर्यांची अडवणूक करू नका, शासकीय कार्यालयात येणार्या प्रत्येकाची कामे करा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महसूल मंत्री उवाच : शेतकर्यांच्या घरी जाऊन ई-केवायसीचे निर्देश य दुष्काळात शेतकरी आत्महत्या झाल्यास अधिकार्यांची गय नाही
जळगाव (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकर्यांच्या अडचणी सोडवुन त्यांना मदत करावी असे निर्देश देत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले. ते म्हणाले, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणार्या प्रत्येक नागरिक आणि शेतकरी यांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणी तत्परतेने सोडवाव्यात नागरिकांची व शेतकर्यांची अनावश्यक अडवणूक करू नये शिवाय दुष्काळात शेतकर्याची आत्महत्या झाल्यास अधिकार्याची खैर करणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी देत प्रशासनाने संवेदनशीलपणे व तत्परतेने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
जळगावात उपायययोजनांचा आढावा
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आज आयोजित बैठकीत महसूल मंत्री श्री बावनकुळे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
नागरिकांना वेठीस धरू नका
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, शेतकर्यांना पीककर्ज वितरण तसेच कृषीपंपांना वीजजोडणी देताना, बँका आणि महावितरणे कोणतीही टाळाटाळ करू नये. शेतकर्यांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करणार्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वारंवार कागदपत्रांची मागणी करून नागरिकांना वेठीस धरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शेतकर्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी करा
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकर्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या घरी जाऊन तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचार्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबवून एकही पात्र शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह वीज केबल चोरीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आणि महावितरणने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
अधिकार्यांना मुख्यालयी थांबण्याचे निर्देश
शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुख्यालयी उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित वरिष्ठ अधिकार्यांची थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि गतिमान पद्धतीने काम करावे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तत्पर सेवा देण्याचे निर्देश श्री बावनकुळे यांनी दिले.
शेतकर्यांना सुरळीत वीज द्या
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच शेतकर्यांना नियमित वीजपुरवठा होईल या दृष्टीने महावितरण विभागाने दक्षता घ्यावी, चारा उपलब्ध होईल अशा प्रकारची पिके शेतकर्यांनी आपल्या शेतात घ्यावीत. वनविभागाने सुद्धा या संदर्भात नियोजन करावे असे त्यांनी सांगितले. बैठकीत, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मतदार संघातील आवश्यक उपयोजना संदर्भात सूचना मांडल्या.
अंमलबजावणीचे सादरीकरण
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रास्ताविकात पर्जन्यमान, पीक स्थिती, जलसाठा, पाणीटंचाई, चार्याची उपलब्धता बाबत सद्यस्थितीची माहिती दिली तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे सादरीकरण केले. बैठकीला, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, पोलीस,आरोग्य यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


