पळासनेर येथून एक लाख 29 हजारांचा गुटख्याचा साठा जप्त

धुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईने तस्करांच्या गोटात खळबळ


शिरपूर (बुधवार, 6 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या किराणा दुकानावर अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाने कारवाई केली. शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल एक लाख 29 हजार 341 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आल्याने अवैधरित्या गुटखा विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अन्न व औषध प्रशासन, धुळे यांना गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर येथील वीरेंद्रसिंग अजितसिंग गिरासे यांच्या मे.गजानन माऊली किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकार्‍यांनी संबंधित दुकानाची तपासणी केली असता दुकानात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. तपासणीनंतर हा साठा पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन, सांगवी येथे आणण्यात आला. या प्रकरणी वीरेंद्रसिंग अजितसिंग गिरासे (रा. पळासनेर, ता. शिरपूर) यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई सह आयुक्त (अन्न), नाशिक मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) धुळे गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पवार, अभिजीत जाधव, शशिकांत राणे, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद राऊत आणि मंगेश भावसार आदींनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !