भुसावळ विभागात स्वच्छता पंधरवड्यानिमित्त ट्रॅकसाइड आणि लीगेसी वेस्ट स्वच्छता अभियान
भुसावळ (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : भुसावळ विभागात स्वच्छता पंधरवडा 2026 अंतर्गत 1 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विभागातील विविध रेल्वे स्थानके तसेच रेल्वे परिसरात स्वच्छते संदर्भातील विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने बुधवार, 6 ऑक्टोबर 2026 रोजी ट्रॅकसाइड आणि लीगेसी वेस्ट स्वच्छता अभियान अंतर्गत विभागातील प्रमुख तसेच मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकांवर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
दीर्घकालीन साचलेला कचरा हटवला
या अभियानांतर्गत जळगाव, अमरावती, मूर्तिजापूर, नाशिक रोड, पाचोरा, मलकापूर, बडनेरा, मनमाड, शेगाव, बुर्हाणपूर, अकोला आणि खंडवा या रेल्वे स्थानकांवर रॅग पिकिंगच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅक तसेच आजूबाजूच्या परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली. रेल्वे ट्रॅकच्या कडेला दीर्घकाळापासून साचलेला कचरा, प्लास्टिक व स्क्रॅप हटविण्यासोबतच चिन्हांकित लीगेसी वेस्ट आणि जीच्हीपीचीही स्वच्छता करण्यात आली.
झुडूपे व वनस्पती हटवल्या
अभियानादरम्यान ट्रॅकच्या कडेला वाढलेली झुडपे तसेच अनावश्यक वनस्पती हटविण्यात आल्या ज्यामुळे ट्रॅक आणि सिग्नलची दृश्यमानता सुधारण्यास मदत झाली. लेव्हल क्रॉसिंग, गेट लॉज, केबिन आणि कर्मचारी निवासस्थानांच्या परिसरात साचलेल्या कचर्याचीही स्वच्छता करण्यात आली. संकलित करण्यात आलेल्या कचर्याचे संकलनस्थळीच पुनर्वापरयोग्य तसेच पुनर्वापर न करता येणारा/जैविक कचरा अशा स्वतंत्र प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. स्वच्छता अभियानासोबतच जनजागृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील स्टेशन मॅनेजर कार्यालयासमोर राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगाव यांच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे प्रवासी तसेच नागरिकांना रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्याचे, कचरा निर्धारित ठिकाणी टाकण्याचे तसेच रेल्वे परिसरात कचरा इतरत्र न फेकण्याचे आवाहन करण्यात आले.


