स्वच्छ धान्याचा पुरवठा करण्यासह खोट्या तक्रारींची चौकशी करा : भुसावळात राज्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीत विविध ठरावांना मंजुरी
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, 5 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता भुसावातील शासकीय विश्रामगृहात जिल्हा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत विविध ठराव पारीत करण्यात आले.
दरम्यान, बैठकीला तालुक्यातील 70 ते 80 स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यात स्वस्त धान्य दुकानदार यांना येणार्या अनेक अडचणी मनी मार्जिनसह सर्वच प्रमुख विषयांवर चर्चा करून सर्वानुमते ठराव पारित करण्यात आले.
हे ठराव पारीत
प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत स्वस्त धान्य दुकानदार यांना स्वच्छ व चांगल्या प्रतीचे धान्य मिळावे, सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय धान्य गोदामातून प्रत्येक गोणीमध्ये 50 किलो 580 ग्रॅम वजनाचे धान्य पूर्ण देण्यात यावे तसेच लाभार्थींना वितरित करण्यात येणारे धान्य स्वच्छ व मनुष्याच्या सेवनासाठी योग्य असावे अस्वच्छ अथवा खराब धान्याचा पुरवठा करू नये, भुसावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवरती काही राजकीय मंडळी खोट्या तक्रारी दुकानदारांना नाहाक त्रास देण्याचे अधिकारी वर्गाला हाताशी धरून राजकीय दबाव खाली काम करतात त्या गोष्टींचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला आणि अधिकारी यांना सुद्धा अशा राजकीय दबावाला बळी न पडता केलेल्या तक्रारीची शहानिशा केली पाहिजे या संदर्भातील निवेदन लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच अन्नपुरवठा मंत्र्यांना देण्याचे ठरले, ई केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदार सांगूनही काही लाभार्थी जाणून-बुजून ई केवायसी करत नाही त्यामुळे तो दोष स्वस्त धान्य दुकानदाराचा नसून तो लाभार्थ्यांचा आहे याची दखल घेण्यात यावी, स्वस्त धान्य दुकानदारांना बर्याच ठिकाणी शिवीगाळ तसेच त्यांना मारहाणीच्या घटना सर्रास घडतात तरी अशा लोकांविरोधात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा आदी ठरावांना मंजुरी देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष भागवत पाटील, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय, भुसावळ तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, महिला आघाडीच्या टीना धांडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, नाना पाटील, ईश्वर पवार, नितीन जैन, आर.बी.चौधरी, शांताराम इंगळे, प्रतीक आंबेकर, उल्हास भारसके, नमा शर्मा, पी.एस माखीजा, रमेश भिला पवार, छाया बोंडे, संतोष माळी, गोपाळ परदेशी असंख्य रेशन दुकानदार बांधव उपस्थित होते.


