दुर्गोत्सवातील प्रत्येक मंडळावर पोलिसांची नजर : रावेरात पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर

यंदा 36 दुर्गोत्सव मंडळांची शहरात नोंद : सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन


रावेर (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : शहरातील प्रत्येक दुर्गोत्सव मंडळावर पोलिसांची नजर असेल. पोलिसांची गोपनीय यंत्रणाही सतर्क राहणार असून शहरातील शांतता भंग करणारे घटक आमच्या रडारवर असतील. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी येथे केले. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बडगुजर बोलत होते.

36 मंडळांची नोंद
रावेर शहरात सध्या 36 दुर्गोत्सव मंडळांची नोंद असून रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 83 मंडळे असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नवरात्रोत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो त्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची मंडळांनी तसेच नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही उपअधीक्षक बडगुजर यांनी सांगितले.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी
बैठकीत विविध दुर्गोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनीही आपल्या समस्या व मागण्या मांडल्या. नवरात्रोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण विभागाने विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लक्षात घेता महामार्गालगत होणारी मांस विक्री उत्सवाच्या काळात बंद ठेवावी, अशी मागणीही मंडळांच्या प्रतिनिधींनी केली.

यांची होती उपस्थिती
बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महावितरणचे अधिकारी निरंजन कोष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरिष गनवानी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, भाजप किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पाटील, नगरसेवक सादीक मेंबर, नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजपचे माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, सचिव अजिंक्य वाणी, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाणी, डी. डी. वाणी, डॉ. सुरेश पाटील, शैलेश अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते महेमूद शेख, वसीम शेख, पंकज वाघ, गयास शेख यांच्यासह विविध दुर्गोत्सव मंडळांचे अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !