वरणगावात पालिकेची धडक मोहीम ; 25 किलो प्लास्टिक जप्त

35 हजारांचा दंड वसूल : व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई ; प्लास्टिकमुक्त शहरासाठी नगरपरिषदेचा पुढाकार


वरणगाव (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : सेवा संकल्प अभियानांतर्गत वरणगाव नगरपरिषदेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने तब्बल 25 किलो प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले. नियमांचे उल्लंघन करणार्‍या संबंधित व्यापार्‍यांकडून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने सिंगज यूज प्लास्टीक वापरणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली.

दंडात्मक कारवाईने खळबळ
वरणगावचे मुख्याधिकारी राहुल भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या स्वच्छता व नियंत्रण पथकाने शहरातील प्रमुख बाजारपेठा, आठवडे बाजार परिसर तसेच विविध दुकानांमध्ये अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक ग्लास, वाट्या आणि अन्य प्लास्टिक साहित्याचा वापर होत असल्याचे आढळून आले. संबंधित व्यापार्‍यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत रशीद नौरंगाबादी, राहुल जाधव, संतोष गुजरे, दीपक काळे, राजू गायकवाड, संजय माळी आणि रविकांत नारखेडे यांनी सहभाग घेतला.

प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन
प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा तसेच प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नगरपरिषदेच्या या कारवाईचे पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून स्वागत होत असून, प्लास्टिकमुक्त वरणगाव घडविण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !