वैशालीमध्ये गंगा नदीत होडी उलटली : 15 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलींची संख्या अधिक
राघोपूरमध्ये मेजवानीला जाताना काळाचा घाला ; सुमारे 20 जणांचा होडीतून प्रवास, मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत
वैशाली/बिहार (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील राघोपूर परिसरात गंगा नदीत होडी उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांमध्ये लहान मुलींची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
मेजवानीला जात असताना दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, रामपूर श्यामचंद पंचायतमधील भगतान टोळा परिसरात माता महाराणी स्थानाजवळ सिंघेश्वर राय यांच्या घरी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुमारे 20 जण एका छोट्या होडीतून जात होते. त्याचवेळी गंगा नदीत होडी उलटल्याने प्रवासी पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला.





मृतांमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश
या दुर्घटनेत पिंकी कुमारी (13), अंकिता कुमारी (6), अलीशा कुमारी (18), सुनीता कुमारी, आर्यन कुमार, सिकी कुमारी, भोणू कुमारी आणि मीरा कुमारी यांच्यासह अन्य व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी 15 जणांना मृत घोषित केले. बचावकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकालाही पाचारण करण्यात आले.
तेजस्वी यादव यांच्याकडून दुःख व्यक्त
या दुर्घटनेनंतर बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून दुःख व्यक्त केले. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या होडी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करत त्यांनी राज्य सरकारकडून प्रत्येक मृताच्या वारसांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मदत व बचावकार्य वेगाने पूर्ण करण्यासह जखमींना योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
