महाराष्ट्रातील 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलणार ! भुसावळ, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील विद्यालयांचाही समावेश


गणेश वाघ
भुसावळ (गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र शासनाने राज्यातील 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने बुधवार, 21 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, वरणगाव, जामनेर आणि मुक्ताईनगर येथील शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवीन नावे देण्यात येणार आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विद्यालयांचाही या निर्णयात समावेश आहे.

भुसावळच्या तांत्रिक विद्यालयाला माजी आमदार डी.के.चौधरींचे नाव
भुसावळच्या शासकीय तांत्रिक विद्यालयाला माजीआमदार डी.के. चौधरी यांचे नाव देण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार, भुसावळ येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामकरण डी.के.चौधरी शासकीय तांत्रिक विद्यालय, भुसावळ असे करण्यात आले आहे. जळगाव येथील विद्यालयाला डॉ.अविनाश आचार्य यांचे, तर वरणगाव येथील विद्यालयाला कवीवर्य केशवसुत यांचे नाव देण्यास मान्यता मिळाली आहे. जामनेर येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नाव भंवरलाल जैन शासकीय तांत्रिक विद्यालय, जामनेर तर मुक्ताईनगर येथील विद्यालयाला दगडू राठोड यांचे नाव देण्यात आले आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील बदल
धुळे जिल्ह्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नाव वैद्य प्र.ता.जोशी शासकीय तांत्रिक विद्यालय, धुळे तर साक्री येथील विद्यालयाला नानासाहेब पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. नंदुरबार येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामकरण बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार असे करण्यात आले आहे.

राज्यातील 25 विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता
शासन निर्णयामध्ये मुंबई शहर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील एकूण 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांचा समावेश आहे. इतर विद्यालयांमध्ये बदलापूर, मुरबाड, उल्हासनगर, तलासरी, जव्हार, रत्नागिरी, राजापूर, महाड, पेण, रोहा आणि शिरगाव येथील संस्थांचा समावेश आहे.

शासन निर्णयानंतर पुढील कार्यवाही
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 162 शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि माध्यमिक स्तरावर कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, या पार्श्वभूमीवर ही विद्यालये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !