जबरी चोरी प्रकरणात दोन वर्षांपासून पसार धुळ्यातील आरोपींना अटक
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : संशयीतांचा ताबा धरणगाव पोलिसांकडे
जळगाव (गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026) : जळगाव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांमधील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून पसार असलेल्या धुळे जिल्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले. अजय भाईदास थोरात (27, रा.नवलनगर, ता.धुळे) व संभाजी बाळू पाटील (26, रा.सातरणे, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
विशेष पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांतील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकार्यांना विशेष पथके तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पसार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली. विशेष पथकाला धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 460/2024 मधील आरोपींबाबत माहिती मिळताच त्यांना अटक करण्यात आली.

वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार हरिलाल पाटील, हवालदार विलेश सोनवणे, कॉन्स्टेबल राहुल कोळी, कॉन्स्टेबल विलास गायकवाड, चालक महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली.
