चिंचोडा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेला जमिनीचा हिस्सा कमी करण्यासाठी स्वीकारली दिड हजारांची लाच


येवला (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेला जमिनीचा हिस्सा कमी करण्यासाठी तडजोडीअंती दिड हजारांची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील चिंचोडा तलाठ्याला नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने महसूलमधील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. राहुल प्रल्हाद रीडे (44, स्वामी समर्थ केंद्र, विठ्ठलनगर, ता.येवला, जि.नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदाराने 5 सप्टेंबर 2026 रोजी नाशिक ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील चिचोंडी बुद्रुक येथील गट क्रमांक 38/4 मधील 22 आर जमिनीच्या हिस्स्यासंदर्भात तक्रार केली होती. संबंधित जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेला हिस्सा कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज देण्यात आला होता.

या प्रकरणात तलाठी राहुल प्रभाकर रिंढे यांनी तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या जमिनीतील हिस्सा कमी करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागितल्याने 28 रोजी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली व सापळा रचून याच दिवशी आरोपी तलाठ्याला अटक करण्यात आली.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस उपअधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी यांनी केली. तपास पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !