80 हजारांची लाच मागणी भोवली ; मालेगावच्या आयुक्तांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने लाचखोरांच्या तंबूत खळबळ
गणेश वाघ
भुसावळ (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेतील आयुक्तांसह तिघांना नाशिक एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या तंबूत घबराट पसरली आहे. विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी ही कारवाई झाली तर दुसरीकडे आयुक्तांचे नाव रस्त्याला देण्याची तयारी सुरू असतानाच आयुक्तांना लाचखोरीत पकडण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. आयुक्त रवींद्र जाधव हे आगामी 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त (रिटायर) होणार होते मात्र निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच हातात बेड्या पडल्याने संपूर्ण राज्यभरात आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.
या लाचखोरांना अटक
रवींद्र शेषराव जाधव असे अटकेतील आयुक्तांचे तसेच निलेश वसंतराव पाटील असे स्वीय सहाय्यकाचे तसेच हरिश नथुराम डिंबर असे लेखापालाचे नाव आहे.
भ्रष्ट अधिकार्यांचे उदात्तीकरण कशासाठी ?
29 रोजी महापालिकेची सभा होती मात्र सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच एसीबीच्या पथकाने आयुक्तांसह तिघांना अटक केल्याने ज्या अधिकार्याच्या नावाचा फलक रस्त्यावर लावण्याची तयारी सुरू होती तोच अधिकारी लाचेच्या विळख्यात अडकल्याचे समोर येताच शहरात तीव्र संताप उसळला. ‘भ्रष्ट अधिकार्यांचे असे उदात्तीकरण कशासाठी?’असा सवाल करत नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रशासनाचा पंचनामा केला. सभेसाठी आलेल्या ‘एमआयएम’ पक्षाच्या नगरसेवकांनी हातात फलक झळकावून जोरदार घोषणाबाजी करत याबद्दल निषेध नोंदवला.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदाराने 9 जुलै 2026 रोजी या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. दोन ठेकेदारांनी महापालिकेची कामे केल्यानंतर त्याबाबतचे बिल आरटीजीएसने जमा करण्यासाठी चार टक्केप्रमाणे एकूण 80 हजारांची लाच दोन्ही अधिकार्यांनी मागितली होती तर लाच पडताळणीत 10 व 13 जुलै रोजी त्यांनी त्याबाबत संमतीही दर्शवली व 15 रोजी लेखापाल हरीश डिंबरने लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट होताच तिघा आरोपींना अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेंबाडे, हवालदार युवराज खांडवी, चालक हवालदार विनोद पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
नागरिकांना तक्रारीचे आवाहन
शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.