यावल हादरले : अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या पत्नीला संपवले : आरोपी पतीला अटक
शेख काबीज
यावल (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या पत्नीला पतीने संपवल्याची धक्कादायक व संतापजनक घटना यावल शहरात घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. मशीराबी फरदीन खान (20) असे विवाहितेचे व फरदीन खान अरिफ खान (21) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सोलर टेक्निशियन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अवघ्या एक वर्षभरापूर्वीच लग्न
यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत विस्तारित भागात आयेशा नगर असून त्या भागात तिरुपती नगरात शेख साबीर शेख आमीन यांच्या घर क्रमांक 570 मध्ये भाडेकरू म्हणून आरीफ खान गनी खान राहतात. त्यांचा मोठा मुलगा फरदीन खान आरीफ खान (21) याचे गेल्या वर्षीच लग्न सुरत निवासी सैय्यद अकबर सैय्यद छोटू यांची कन्या मशीराबी फरदीन खान (20) हिच्याशी 2025 विवाह झाला होता.






संशय आल्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस
सोमवार, 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारच्या सुमारास विवाहितेच्या पित्याला तिच्या सासरच्या मंडळींकडून फोनवरून घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ते यावलला पोहोचल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी घरातील परिस्थिती तसेच मुलीच्या मृत्यूबाबत त्यांना संशय निर्माण झाल्याने त्यांनी सासरच्या मंडळींकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाली नसल्याने त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता विवाहितेच्या शरीरावर काही जखमांचे निशाण दिसून आले. सतत होणार्या आपसी वादातून व मारहाण केल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांनी यावल पोलिसात फिर्याद दाखल केली.
वादानंतर पत्नी केली हत्या!
समजलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या कुटुंबातील इतर लोक एका लग्न समारंभात गावातच गेल्यानंतर सोमवारी दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादातून फरदीन खान याने त्याच्या पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबून तिची हत्या केली व तो पसार झाला. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने तातडीने यावल पोलिसांना माहिती कळवण्यात आली.
साकळीजवळून आरोपीला अक
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद, हवालदार वासुदेव मराठे, वसीम तडवी, एजाज गवळी, अर्षद गवळी, अलाउद्दीन तडवी हे घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा केल्यानंतर फरदीन हा पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्याला साकळी या गावाजवळून अटक करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.