जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत
सेवानिवृत्त डाक कर्मचार्यांच्या पेन्शनविषयक तक्रारी सादर करण्याचे आवाहन
जळगाव (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त डाक कर्मचार्यांच्या पेन्शनविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता डाक अधीक्षक, जळगाव विभाग यांच्या कार्यालयात विभागीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
पेन्शनविषयक ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही किंवा ज्याबाबत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींचा पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येईल. यामध्ये टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा समावेश असेल मात्र, वारस हक्कासारखी वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे तसेच धोरणविषयक सूचना व तक्रारींचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.






संबंधित पेन्शनधारकांनी आपल्या तक्रारी डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव – 425001 या पत्त्यावर दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारपर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवाव्यात. पहिल्या गुरुवारनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा संबंधित महिन्याच्या पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही. पात्र पेन्शनधारकांनी आपल्या तक्रारी विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन जळगाव डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.