‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रमातून भुसावळात दिव्यचक्षू महिलांच्या जीवनात आनंदाची पणती !
भुसावळ (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : खानदेश अंधकल्याण संघ संचलित स्नेहादीप निराधार अंध महिला संस्थेतर्फे रेल्वे सिनिअर इन्स्टिट्यूटमध्ये ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम उत्साहात झाला. दिव्यचक्षू बंधू-भगिनींची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने संस्थेतर्फे प्रत्येकाला रवा, तेल, तूप, मैदा, डाळी, साखर, गूळ, साबण आदी दिवाळीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी आरती चौधरी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे व प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कावेरी चौधरी यांनी केले. प्रास्ताविक करताना खानदेश अंधकल्याण संघाचे संस्थापक कार्यकर्ते संजय पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत दिव्यचक्षू महिलांच्या आश्रमाच्या बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले.






हास्यासह आनंद कायम राहण्यासाठी कटीबद्ध
यावेळी रजनीताई सावकारे यांनी दिव्यचक्षू बंधू-भगिनींच्या चेहर्यावरील हास्य आणि आनंद कायम राहावा, यासाठी आपण व आपले पती सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनीही संस्थेला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. स्वागतगीत दिव्यचक्षू संजय बडगुजर यांनी सादर केले. व्यासपीठावर दिव्यचक्षू प्रतिनिधी आनंदा कोल्हे उपस्थित होते.
आनंद हा वाटल्याने वाढतो : आरती चौधरी
आरती चौधरी यांनी रजनी सावकारे व शैलजा नारखेडे यांचे मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या, आनंद हा वाटल्याने वाढतो म्हणूनच आम्ही दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच आमची दिवाळी खर्या अर्थाने आनंदमय होते. चांगल्या कार्यासाठी नेहमीच मदतीचे हात पुढे येतात, याचा प्रत्यय आज पुन्हा आला. प्रमुख पाहुण्यांनी उदार मनाने मदतीची तयारी दर्शविली, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
कार्यक्रमाला स्नेहादिप संस्थेच्या संचालिका स्वाती नाईक, लता होसकोटे, कावेरी चौधरी उपस्थित होत्या. या शिवाय जयश्री दवे, मंगला पाटील, जयश्री पाटील यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
दिवाळी केवळ दिव्यांनी नव्हे तर दुसर्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण केल्याने खर्या अर्थाने उजळते, हा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.