जळगाव जिल्ह्यात गोवंश कत्तल व मांस विक्री करणारी दोघांची टोळी सहा महिन्यांसाठी हद्दपार

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कलम 55 चा प्रभावी वापर करीत केली कारवाई


जळगाव (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तल, गोमांस विक्री तसेच जनावरांना ठार मारणे व विकलांग करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीविरुद्ध जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली. टोळीचा प्रमुख मुक्तार जमाल कुरेशी (40) व टोळी सदस्य परवीनबी मुक्तार कुरेशी (45, दोघेही रा.36 खोल्या, फातिमा नगर, जळगाव) यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यापूर्वी केली कारवाई
जळगाव जिल्ह्यात गोवंश कत्तल व अवैध मांस विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.







नशिराबाद पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव
जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध कत्तल व मांस विक्रीसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी संबंधित आरोपींविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या आधारे पोलीस प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली.

आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल
मुक्तार जमाल कुरेशी आणि परवीनबी मुक्तार कुरेशी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता आणि इतर संबंधित कायद्यांनुसार विविध गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, एका प्रकरणाचा तपास प्रलंबित असल्याची नोंदही प्रसिद्धीपत्रकात आहे.

सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये दोन्ही आरोपींना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. अवैध गोवंश कत्तल व मांस विक्रीसारख्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही कारवाई केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !