10 हजारांची लाच भोवली : जळगाव जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अधिकार्यासह कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात
जळगाव (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : केलेल्या कामांच्या बिल मंजुरीसाठी तडजोडीअंती दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मनसुलाल शिसोदे (55, आदर्श नगर, जळगाव) व कनिष्ठ अभियंता भागवत वसंता चवरे यांना जळगाव एसीबीने सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी अटक केल्याने जिल्हा परिषदेतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदार हे 42 वर्षीय सबकंत्राटदार असून त्यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षात पिंप्री खुर्द, ता.धरणगाव येथे अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची नऊ लाख 90 हजार 763 रुपयांची कामे केली आहेत. पूर्ण केलेल्या कामांची एमबी (मोजणी पुस्तिका) व बिले तयार करण्यासाठी भागवत चवरे यांच्याकडून 20 हजारांची लाच स्वीकारण्यात आली होती मात्र बिले मंजूर न झाल्याने त्याबाबत विचारपूस करण्यासाठी तक्रारदार गेल्यानंतर चवरे यांनी कामांच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी व ते जळगाव जि.प.कडे पाठवण्यासाठी एकूण बिलाच्या दिड टक्क्यांप्रमाणे 15 हजारांची लाच मागणी केली व 2 रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी केली असता आरोपीने दहा हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवताच सापळा रचण्यात आला. आरोपी चवरेने लाच स्वीकारून ती शिसोदे यांना देताच आरोपींना अटक करण्यात आली.






आरोपींकडून लाखोंचे घबाड जप्त
आरोपी शिसोदे यांच्या अंगझडतीत अॅपल कंपनीचा मोबाईल व 91 हजार 620 रुपयांची रोकड तर आरोपी चवरेच्या झडतीत मोबाईल फोन व 20 हजार 600 रुपयांची रोकड आढळल्याने ती जप्त करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे, हवालदार बाळू मराठे, महिला हवालदार संगीता पवार आदींच्या पथकाने यशस्वी केला.